शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्रात्यक्षिकांबद्दल शेतकर्यांनी व्यक्त केले समाधान

-
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्रात्यक्षिकांबद्दल शेतकर्यांनी व्यक्त केले समाधान
दि. 11 जानेवारी, 2022
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबवत असलेल्या भारतीय कृषि अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत रब्बी ज्वारी व हरभरा या पिकांची पीक प्रात्यक्षिके समाधानकारक आहेत. या प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामात रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान आणि हरभरा उत्पादन तंत्रज्ञानाची पीक प्रात्यक्षिके चिंचविहिरे, कणगर, तांभेरे आणि कानडगाव या ठिकाणी घेण्यात आली आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने प्रसारित केलेले फुले सुचित्रा व फुले रेवती हे रब्बी ज्वारी पिकाचे वाण तसेच हरभरा पिकाचे फुले विक्रम व फुले विक्रांत या वाणांसह शिफारशीत तंत्रज्ञानाचे अवलंबन या पीक प्रात्यक्षिकांमध्ये करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झालेल्या शेतकर्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठ तज्ञाद्वारे प्रशिक्षित करण्यात आले. याबरोबर शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे व त्यांचे सहकारी सहसमन्वयक हा प्रकल्प या चार गावांमध्ये राबवत आहे. नुकतेच विद्यापीठाचे कडधान्य प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दिपक दुधाडे आणि प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांनी या पीक प्रात्यक्षिकांची पहाणी करुन शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या चमुने चिंचविहिरे येथील सुनिल गाडे व गोरक्षनाथ शिंदे यांच्या रब्बी ज्वारी व हरभरा पीक प्रात्यक्षिकांची पहाणी केली. तसेच कणगर येथील प्रविन गाडे, तांभेरे येथील मेजर ताराचंद गागरे, आदिनाथ गागरे, सोन्याबापू मुसमाडे आणि कानडगाव येथील मधुकर गागरे यांच्या पीक प्रात्यक्षिकांना भेटी दिल्या. या रब्बी पीक प्रात्यक्षिकांबद्दल शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीचे नियोजन संशोधन सहयोगी विजय शेडगे आणि प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर आणि राहुल कोर्हाळे यांनी केले.
प्रतिनिधी राहुरी
अशोक मंडलिक