शारदा स्पोर्टस ॲकडमीचे संचालक रणवीर पंडित यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन.
खेळातूनच धाडसी निर्णय घेण्याचे कौशल्य मिळत असते:-रणवीर पंडित.
शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे. यासाठी शालेय स्तरापासूनच क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून ग्रामीण भागामध्ये या क्रीडा स्पर्धामुळे चांगले वातावरण तयार झाले आहे. आजच्या पिढीला संकटाला सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे. खेळातूनच धाडसी निर्णय घेण्याचे कौशल्य मिळत असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळले पाहिजे असे प्रतिपादन शारदा स्पोर्टस ॲकडमीचे संचालक रणवीर पंडित यांनी केले.
मोठ्यांची व विशेषतः राजकारण्यांची मुले (सर्वच नाही) शिकून सवरून आली कि मग आपल्या साम्राज्यातील हवेत उडत उदघाटन, समारंभ, स्वतःच्या संस्थांतील कार्यक्रमे अशा ठिकाणी आढळतात. पण रणवीर अमरसिंह पंडित अपवाद असलेल्यांपैकी एक. ऑस्ट्रेलियात शिकले आणि तेथेच क्रीडा प्रशिक्षण घेतले. इकडे आले तसे राजकारण, संस्था, कारखाना या फांद्यातून ते थेट शाळांच्या क्रीडा मैदानात उतरले. ग्रामीण विद्यार्थी खेळाच्या मैदानात उतरला पाहिजे या हेतूने जयभवानी व जगदंबा या शिक्षण संस्थांतील शाळा – महाविद्यालयांत मैदानांची दुरुस्ती करताना अगदी सर्व मैदानांत लाल माती टाकून घेणे, शाळांत क्रीडा साहित्य पुरवून खेळांचे तास झालेच पाहिजे असा दंडक उभारून शाळांतर्गत स्पर्धा सुरु केल्या.
शारदा क्रीडा अकादमीच्या माध्यमातून दोन्ही संस्थांतील शाळांच्या विद्यार्थ्यांना निष्णात प्रशिक्षकांकडून खेळाचे धडे सुरु केले. शाळांतील स्पर्धा तीन वर्षांपासून संस्थांतर्गत शाळांत होत आहेत. यंदाही शारदा महोत्सवात कबड्डी, खो – खो, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, ऍथलेटिक्स, चेस अशा स्पर्धांत 18 शाळांतील 1800 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यात 750 ग्रामीण मुली देखील सहभागी आहेत. 2032 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये या शाळेतला विद्यार्थी खेळाडू सहभागी व्हावा असे स्वप्न पाहत त्याच्या पूर्ततेसाठी रणवीर पंडित प्रयत्नरत आहेत. आज या महोत्सवातील 14 ते 17 वयोगटातील कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाला उपास्थित होतो. अगदी बड्या शासकीय कार्यक्रमांत असते त्या तोडीचे विद्यार्थ्यांचे संचलन व पाहुण्यांना मानवंदना आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रंगतदार सामने पाहून रणवीर पंडित यांचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा