वांगी टाकळीभान रोड वरती पाण्याच्या बाटली वरून डोक्यात दगड घालून खून

वांगी टाकळीभान रोड वरती पाण्याच्या बाटली वरून डोक्यात दगड घालून खून
हॉटेलमध्ये पाण्याची बाटली मागितल्याने त्याचा राग येवून झालेल्या शिवीगाळीनंतर पुढे जाऊन बाटली मागणाऱ्यांची मोटारसायकल अडवून त्यांना मारहाण करून एकाला पुलावरून खाली फेकत त्याचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार खिर्डी – टाकळीभानरोडवर घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास भाऊसाहेब डुकरे, सुरेश म्हसू शिंदे, विजय गंगाराम पवार हे तिघे मोटारसायकलवर सोनई येथे काम असल्याने गेले होते. टाकळीभानला लग्न असल्याने ते पुन्हा सकाळी ८.३० च्या सुमारास सोनईहून निघाले. टाकळीभान येथे जात असताना वांगी शिवारात असणाऱ्या हॉटेल कृष्णा येथे ते तिघे थांबले. हॉटेल मालकाची परवानगी घेवून त्यांनी आणलेला जेवणाचा डबा हॉटेलमध्ये खोलला. जेवण झाल्यानंतर विजय गंगाराम पवार याने बाजूला बसलेल्या विनायक संजय पाळंदे, किशोर संजय गायकवाड यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली. तेव्हा त्यांनी बाटली न देत शिवीगाळ केली तसेच तुम्हाला पाण्याची बाटली विकत घेता येत नाही का? असेम्हणत बाचाबाची केली. वाद वाढत असल्याने डुकरे, शिंदे, पवार हे तिघेही हॉटेलबाहेर आले. पाळंदे आणि गायकवाड हे दोघेही त्यांच्याआधी उठून निघून गेले. डुकरे, शिंदे, पवार हे तिघे टाकळीभानकडे जाण्यासाठीटाकळीभान रोडने जात असताना खिर्डी भागातील पाटचारीच्या पुलावर पाळंदे आणि गायकवाड यांनी या तिघांना अडवत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
यावेळी तिघांनीही मोटारसायकलवरून उतरून आम्हाला कशाला अडविले ? शिव्या कशाला देता? असे विचारले असता त्यांनी पुन्हा शिवीगाळ केली आणि म्हणाले तुम्ही आमच्या गावात येतात आणि आम्हाला शहानपणा शिकवता, असे म्हणत शिवीगाळ करतअसताना विजय पवार हा त्यांना विरोध करण्यासाठी पुढे गेला तेव्हा त्याला त्यांनी पुलाच्या खाली ढकलून दिले. तेव्हा डुकरे आणि शिंदे हे त्याला वाचविण्यासाठी जात असताना त्यांना पाळंदे आणि गायकवाड मारहाण केली तसेच पुलाखाली जाऊन पडलेल्या विजय पवार याच्या चेहन्यावर जोरात दगड मारला. यावेळी त्याच्या चेहऱ्यातून तसेच डोक्यातून रक्तस्त्राव होवून तो बेशुद्ध पडला.
यावेळी घाबरलेले डुकरे आणि शिंदे हे दोघेही तेथून वांगी गावाच्या दिशेने पळून गेले. थोड्यावेळाने ते पुन्हा पुलाजवळ गेले तेव्हा पाळंदे आणि गायकवाड हे तेथून पळून गेले होते. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा चेहरा पाहून कैलास डुकरे याला चक्कर आल्याने ते दोघेही पुन्हा हॉटेल कृष्णा येथे गेले. तेव्हा त्यांनी हॉटेल मालकाला घटना सांगितली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विजय पवार याला टाकळीभान येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून साखर कामगार हॉस्पीटल येथेदाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात पाठवले परंतु, तेथे दाखल करून न घेतल्याने पवार याला नगर येथील नोबेल हॉस्पीटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
परंतु, आज सकाळी नोबेल हॉस्पीटल येथे उपचार सुरू असताना विजय पवार याचा मृत्यू झाल्याचे तपासी अधिकारी पीएसआय बोरसे यांनी सांगितले. याप्रकरणी कैलास भाऊसाहेब डुकरे, वय-२३, मजूरी, रा. भोकर धंदा- याच्या फिर्यादीवरून आरोपी विनायक संजय पाळंदे, किशोर संजय गायकवाड, दोघे रा. खिर्डी, ता. श्रीरामपूर यांच्याविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात भादंवि कलम ३०७, ३२३, ३४, ३४१, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी पकडले असून पोलीस कोठडीसाठी आज त्यांना दुपारी न्यायालयात हजर करणार असल्याचे तपासी अधिकारी पीएसआय बोरसे यांनी सांगितले. विजय पवारचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्हयात खूनाचे वाढीव कलम लावण्यात येणार असून याप्रकरणी पुढील तपास पोनि. दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अतुल बोरसे हे करीत आहेत.