जीव असून देव झाले त्यांना संत नगदनारायण महाराज म्हणतात

जीव असून देव झाले त्यांना संत नगदनारायण महाराज म्हणतात
श्रीक्षेत्र नारायणगडाच्या भव्य नारळी सप्ताहात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे प्रतिपादन
जीवानी भजन केले त्यांना नगदनारायण महाराज म्हणतात,ज्या मातीने रत्न दिले त्याच सुरळेगावी जन्मभूमीत त्यांचा सन्मान झाला हे सुरळेगावच्या ग्रामस्थांची पुण्याई आहे.जीव असून देव झाले त्यांना श्री संत नगदनारायण महाराज असे म्हणतात.देव मिळवायचा असेल तर संताशिवाय पर्याय नाही. समाजाच्या हितासाठी सतत भजन, कीर्तन करुन ब्रम्हरुप होवून देव झाले त्यांना नगदनारायण महाराज असे म्हणतात त्यांचे वैराग्याने शरिर पुर्ण झाले म्हणून हा ७१ वा भव्य नारळी सप्ताह होतो आहे. असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा वै.नगदनारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने ७१ व्या भव्य वार्षिक नारळी अखंड हरिनाम सप्ताहात सोमवारी सातवे कीर्तनरुपी पुष्प गुंफताना समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे सायं ९ ते ११ या वेळेत कीर्तन झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत प्रेममुर्ती महंत शिवाजी महाराज, ह.भ.प. संभाजी महाराज, हभप नामदेव महाराज शेकटेकर, हरिभाऊ जोगदंड यांच्यासह संत- महंत व वारकरी तसेच पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥
अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥ या अभंगावर चिंतन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांचे प्रारब्ध मोठे आहे. त्यांच्या सेवेचे हे फळ आहे. देवाचे उपकार आहेत आपल्यावर त्यामुळे पैसा असून चालत नाही पैसे, सत्ता, संपत्ती कामी येत नाही परंतु आपल्या लेकरांवर संस्कार चांगले ठेवा. प्रत्येक महिलेने तुळशी लावावी तसेच प्रत्येकाने घरात ज्ञानेश्वरी ठेवा ती सुध्दा कृपा केल्याशिवाय राहत नाही. देव दयाळू आहे देवाचे नामस्मरण करा जीवनात काहीही वाईट होणार नाही. भागवत धर्माचे हेच खरे काम आहे. त्यामुळे देवाचे भजन करुन पुण्य कमवा. काटे सहन करायला शिका सिध्द व्हाल अहंकार करु नका. लोकांना तीन गोष्टी लागतात स्वार्थ, पैसा आणि मान तर वाझ झाडांचे नाव संसार आहे म्हणून संसारात अडकून न राहता भक्ति भावाने ज्ञान मंडपात येवून स्थिर व्हावे तसेच शास्त्र सोडून वागणारे लोक सुखी राहू शकत नाहीत.तसेच शरिराला जपा, आपल्यामुळे सर्व आहे. याचा विचार करा शरिर सांभाळा शरिर हिच खरी संपती आहे. पोरांनो नवीन जमीन घेवू नका परंतु बापाची जमीन मात्र विकू नका. शुध्द शाकाहार घ्या अन् घरचं खा. सध्या अपघाताचे प्रमाण वाढले कारण दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. १८ ते २२ वर्षाचे पोरं दारु पिवून अपघातात जातात हे दुर्देव आहे. पाठीमागे कुटुंबाचे खूप हाल होतात. म्हणून तरुणांनो दारु पिवून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा अभ्यास तसेच उद्योग, व्यवसाय करुन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा असा मौलिक सल्लाही त्यांनी शेवटी बोलताना दिला. तर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी केले. यावेळी महिलांसह पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
सुरळेगाव ग्रामस्थांसह स्वयंसेवक तरुणांचे ह.भ.प. इंदोरीकर महाराजांकडून कौतुक
संत कुलभूषण नगदनारायण महाराजांच्या जन्मभूमीत हा ७१ वा भव्य नारळी सप्ताह होतो आहे. यामुळे ही भूमी पावन झाली आहे. भव्य नारळी सप्ताहात हजारो हात राबले ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले त्यांना नगदनारायण महाराजांची कृपा आणि शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभतील. हेच भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे खरे काम आहे. असे मत व्यक्त करुन सुरळेगाव ग्रामस्थांसह स्वयंसेवक तरुणांचे ह.भ.प. इंदोरीकर महाराजांकडून कौतुक करण्यात आले.