रासायनिक खतांचा कृत्रिम टंचाई शेतकरी हवालदिल…

रासायनिक खतांचा कृत्रिम टंचाई शेतकरी हवालदिल…
टाकळीभान प्रतिनिधी : रासायनिक खतांचा तुटवडा झाला असून कृषी सेवा केंद्रे शेतकऱ्यांना खते शिल्लक नाहीत असे सांगत आहेत. त्यामुळे ऐन जोमात आलेल्या पिकांना खते मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन पिकांबाबत चिंतित झाला आहे. अतिवृष्टी विळख्यात सापडलेला शेतकरी, शेतीमालाला हमीभाव नाही अशा अनेक अडचणींना शेतकरी सामोरे जाऊन कसाबसा भांडवल उभारून पुढच्या पिकांच्या आशावर आहे. त्यातच पिकांसाठी खताची उपलब्धता नसल्याने किमान शासनाने खतांचा पुरवठा तरी सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. काही कृषी सेवा केंद्र चालक आपल्या मर्जीतल्या शेतकऱ्यांना चढ्या भावाने खतांची विक्री करतात. तसेच आलेल्या मालाचा स्टॉक करून ठेवतात. व चढ्या भावाने विक्री करतात याला आळा बसणे गरजेचे असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता शासनाकडून वरूनच युरिया खतांचा पुरवठा कमी येत आहे. यावर्षी गहू, कांदा क्षेत्राचे प्रमाण वाढल्याने खतास मागणी वाढली आहे. तसेच एका शेतकऱ्यास प्रत्येकी एक, दोन गोण्या देण्याचे कृषी सेवा केंद्र संघटनेस सांगितले असल्याचे ते म्हणाले. परंतु प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र चालक खते शिल्लक नाहीत असे बजावत आहेत. अशी वस्तुस्थिती आहे.
वरूनच रासायनिक खतांचा पुरवठा कमी होत आहे, तसेच यावर्षी गव्हाचे क्षेत्र जास्त असल्याने खतांची मागणी जास्त होत आहे, त्याचप्रमाणे टाकळीभान व तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांच्या गोडाऊनची तात्काळ पाहणी करणार असून साठेबाज कृषी केंद्रावर कारवाई करणार आहे… -अजितानंद पावसे (गुणनियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग पं. समिती, श्रीरामपूर )