डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संतसेवा पुरस्कार गुरुवर्य मारुती बाबा कुऱ्हेकर यांना प्रदान;

डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संतसेवा पुरस्कार गुरुवर्य मारुती बाबा कुऱ्हेकर यांना प्रदान;
परोपकाराच्या परंपरेतील व्यक्ती निर्माण व्हाव्यात : हभप कुऱ्हेकर;
डॉ.राजेंद्र विखे यांच्याकडून जोग महाराज संस्थेला १ लाखांची देणगी
वारकरी संप्रदाय विश्वाला वंदनीय असून तो जिवंत ठेवण्यासाठी परोपकारी व्यक्तींची गरज आहे.बाळासाहेब विखे पाटील हे परोपकारी होते.त्यांच्या कुटुंबात या परंपरेतील व्यक्ती निर्माण व्हावेत असे उद्गार जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अध्यापक गुरुवर्य मारुती बाबा कुऱ्हेकर यांनी काढले. दरम्यान लोणी येथील तुकाराम बिजोत्सव सोहळ्यात यावर्षीचा पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार हभप मारुती बाबा कुऱ्हेकर यांना प्रदान करण्यात आला.
लोणी बुद्रुक जि. अहमदनगर येथे सुरु असलेल्या तुकाराम बिजोत्सव २०२२ निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवताचार्य रुक्मिनीताई हावरे यांच्या श्री विठ्ठल चरित्र कथा सोहळ्याची सांगता वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती मंहत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सोमवारी झाली.जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व लोणी बुद्रुक ग्रामस्थानी सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यांच्या वतीने दिला जाणारा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार २०२२ याच सोहळ्यात शांतीब्रम्ह,समन्वय महर्षी, गुरुवर्य मारुतीबाबा कु-हेकर यांना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,ध्रुव विखे पाटील,महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह,मानपत्र व २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.गेल्या पाच वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो.
यावेळी बोलताना हभप कुऱ्हेकर महाराज म्हणाले की,ज्ञानोबा-तुकोबांचा वारकरी संप्रदाय विश्वाला वंदनीय आहे.ज्ञान,संपत्ती देणारा हा संप्रदाय आहे.ज्ञानेश्वर,नामदेव,एकनाथ,तुकाराम अशा अनेक संतांची मांदियाळी आहे.डॉ.बाळासाहेब विखे पाटील परोपकारी होते.त्यांच्या कुटुंबात या परंपरेतील व्यक्ती निर्माण व्हावेत यासाठी परमेश्वराने आशीर्वाद द्यावेत.राष्ट्रासाठी,देवासाठी जीवन जगावे.अलौकिक जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन संतांकडून मिळते.विखे परिवार परोपकारी असल्याने बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती चंद्र-सूर्य असेपर्यंत राहतील असे सांगताना आपल्यासाठी हा पुरस्कार आगळावेगळा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी महंत उद्धव महाराज वारकरी संप्रदायाचे वैभव असल्याचे गौरवोद्गार काढताना त्यांच्या कार्याचेही कौतुक केले.
महंत उद्धव महाराज म्हणाले की,आज या पुरस्काराची उंची वाढली आहे. सामाजिक सेवा आणि संत सेवेत विखे पाटील परिवार हा कायमचं सोबत राहीला आहे. पदमभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि कुऱ्हेकर बाबांचे कार्य समाजाप्रती आहे, जोग महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. किर्तनकार घडवून वारकरी संप्रदाय वाढविला. जोग महाराज संस्था पवित्र कार्य करते.विखे परिवाराला शोभेल असा निधी डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी संस्थेला दिला.लोणीकरांच्या आग्रहामुळेच बाबा इथे आले आहेत. कुऱ्हेकर बाबांनी निष्काम कर्मयोग्या प्रमाणे हे काम पुढे नेण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले.जगद्गुरू संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व लोणी ग्रामस्थांनी बिजोत्सवाच्या माध्यमातून मोठे अध्यात्मिक कार्य सुरू केले असून ते कौतुकास्पद आहे.
अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की,संताचे अनुष्ठान असल्यामुळेच आपण सुखाने जगत आहोत. कुऱ्हेकर बाबांनी हा पुरस्कार स्वीकारल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या की,संताचे ‘विचार प्रेरणा देणारे आहेत.अध्यात्मातून मनशांती मिळते व आदर्श समाज निर्माण होण्यास मदत होते.नव्या पिढीला चांगले संस्कार मिळतात.
यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या वतीने स्व.सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मरणार्थ जोग वारकरी शिक्षण संस्थेसाठी १ लाखाची देणगी यावेळी शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते हभप कु-हेकर बाबांना देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के यांनी केले.मानपत्राचे वाचन मुख्याध्यापक रामचंद्र निंबाळकर यांनी केले तर डेप्युटी अनिल विखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी भागवताचार्या रुक्मिणीताई हावरे,हभप सीताराम महाराज,हभप उदय महाराज घोडके,हभप तुकाराम महाराज,हभप विनोद महाराज,हभप शुभम महाराज,हभप योगेश महाराज,हभप विजय महाराज कुहिले,हभप श्रीकांत महाराज गागरे,हभप नामदेव महाराज जाधव शास्त्री,हभप गोरक्ष महाराज देठे,हभप बाळासाहेब महाराज,हभप संपत महाराज जाधव,हभप सोपान महाराज दिवे,हभप अर्जुन महाराज चौधरी,हभप भारत महाराज धावणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे,सिनेट सदस्य अनिल विखे,माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे,माजी चेअरमन चांगदेव विखे,उपसरपंच गणेश विखे ,सदस्य रामनाथ विखे, ट्रस्टचे अध्यक्ष देविदास म्हस्के,उपाध्यक्ष भाऊ विखे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.