अस्ताव्यस्त वहानांचा व गर्दीचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही झाला त्रास? स्थानिक पोलीस मात्र अनभिज्ञ

अस्ताव्यस्त वहानांचा व गर्दीचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही झाला त्रास? स्थानिक पोलीस मात्र अनभिज्ञ
बेलापूर (प्रतिनिधी )-बेलापुर झेंडा चौकात नेहमीच येथील नेहमीच गजबजलेल्या झेंडा चौक परिसरात होणारी वाहतूक कोंडी हा नित्याचाच भाग झाला आहे. वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी ग्रामस्थांकडून नेहमीच केली जाते अधिकारी ही मागणी मान्य करतात परंतु त्याची अंमलबजावणी आजपावेतो झालेली नाही. याचाच फटका पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना नुकताच बसला.
त्याचे असे झाले की दोन-तीन दिवसांपूर्वी सकाळी साधारण अकरा वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची गाडी बेलापूर हुन पढेगाव कडे जात होती. परंतु झेंडा चौक परिसरात अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती नेमकी या वाहतूक कोंडीत मिटके यांची गाडी अडकली . ड्रायव्हरने प्रथम हॉर्न वाजवून अस्ताव्यस्त गाड्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्ढावलेल्या वाहनधारकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. काही वेळ वाट पाहूनही वाहने बाजूला जात नसल्याचे पाहून शेवटी ड्रायव्हरने सायरन वाजविला. सदर गाडी पोलिसांची आहे हे समजताच आधी बेपरवा असलेल्या वाहनधारकांनी तातडीने आपापली वाहने बाजूला घेतली आणि हे अधिकारी मार्गस्थ झाले.
बेलापूर येथील बस स्टँड पासून ते जे टी एस हायस्कूल पर्यंत दुतर्फा वाहने लावलेली असतात. या बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. प्रसंगी लहान-मोठे अपघात होऊन बऱ्याचदा वाहनधारकांमधे बाचाबाची होते. परंतु याकडे ना पोलीस लक्ष देतात ना ग्रामपंचायत प्रशासन.मध्यंतरी अशा अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांची हवा सोडणे, वॉल किल्ल्या काढून घेणे त्यांच्यवर कायदेशीर कारवाई करणे अशी मोहीम बेलापूर पोलिसांनी सुरू केली होती तिचा अपेक्षित परिणामही दिसू लागला होता परंतु अल्पावधीतच ती मोहीमही थंडावली. ग्रामपंचायत प्रशासनाला तर या गोष्टीशी काही देणे-घेणे नाही असे वाटते.
भविष्यात काही गंभीर घटना घडण्यापूर्वीच ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून नागरिकांना नेहमी होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून मुक्तता करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.