प्रो कबड्डी पुणेरी पलटण टाकळीभानचा हिरो असलम इनामदार

प्रो कबड्डी पुणेरी पलटण टाकळीभानचा हिरो असलम इनामदार
बेंगलोर येथे आठवे सीजन पार पडलेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये पुणेरी पलटण संघाकडून श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील असलम मुस्तफा इनामदार यांने उत्कृष्ट खेळ सादर करून गाव व महाराष्ट्राचे नाव उंचाविले आहे. त्यामुळे प्रो कबड्डी या खेळाचा पुणेरी पलटण संघाचा असलम हा हिरो ठरला आहे.
कबड्डी खेळाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळीभानचे भूमिपुत्र असलम याने सर्व लीगमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १६९ रेड पॉइंट व २० पकडीच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने प्ले ऑफ मध्ये धडक मारली आहे. खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार लहू कानडे, पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी अभिनंदन केले आहे.
आज नागरी सत्कार
प्रो कबड्डी लीग मध्ये असलम यांने केलेल्या कामगिरीबाबत गावाचे नाव उंचविल्याने (ता.४) शुक्रवार रोजी नागरी सत्कार करण्यात येणार असून या सत्कारासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी केले आहे.