आमच हिंदुत्व चूल पेटवणार आणि भाजपचे हिंदुत्व घर पेटवणार //माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य.

आमच हिंदुत्व चूल पेटवणार आणि भाजपचे हिंदुत्व घर पेटवणार -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य.
वीस पंचवीस वर्षे भाजपबरोबर शिवसेनेची सत्ता होती. मात्र ते वीस पंचवीस वर्षे अक्षरश: सडली आहेत. त्यावेळी हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. मात्र नंतर कळालं, त्यांचं हिंदूत्व भर वेगळं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. तर आमचं हिंदुत्व सामान्य माणसाची चूल पेटवणारं आहे, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.नेवासे तालुक्यातल्या सोनई शहरात असलेल्या जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात आमदार शंकराव गडाख मित्र मंडळाच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अंबादास दानवे, आमदार शंकराव गडाख, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, संदेश कार्ले आदींची भाषणं झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत आपण जो उमेदवार द्याल, त्या उमेदवाराला सोनई आणि नेवासे तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने निवडून देतील, अशी ग्वाही आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना दिली.या जनसंवाद मेळाव्याला दक्षिण जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनील गडाख, प्रकाश शेटे पाटील, सोनई सोसायटीचे चेअरमन रामराव गडाख युवा नेते उदयन गडाख, आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते. या संवाद मिळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरदेखील कडवट शब्दांत टीका केली. ते म्हणाले ‘फक्त निवडून येण्यासाठी आणि दिल्लीत जाण्यासाठी मोदींना शेतकऱ्यांची मतं हवी असतात. परंतु शेतकरी ज्यावेळी स्वतःच्या मागण्यांसाठी दिल्लीत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. माझा शेतकरी अगोदरच रडतो आहे. त्याला आणखी कशाला रडवता आहात, असा सवालदेखील ठाकरे यांनी उपस्थित केला.भाजपनं ‘अबकी बार चारसौ पार’, असा नारा दिला असला तरी यावेळी त्यांच्या चाळीस सुद्धा जागा निवडून येणार नाहीत, असा आत्मविश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
भाजप सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही. नुकसान भरपाईदेखील दिली नाही. एक रुपयात पिक विमा या योजनेच्या नावाखाली इन्शुरन्स बँकांच्या अधिकाऱ्यांची घरं भरली. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून त्या निष्ठावंतांचा अपमान करणाऱ्या भाजपला आगामी निवडणुकीत जनता अजिबात थारा देणार नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केला