सरपंच आणि उपसरपंच निवडीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी

सरपंच आणि उपसरपंच निवडीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी
गेवराई तालुक्यातील धक्कादायक घटना
बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरपंच आणि उपसरपंच निवडीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेचा एक ओझरता व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत घटनास्थळी भरपूर मोठी गर्दी जमल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या हाणामारीत महिला सरपंचाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील सरपंच उपसरपंच निवडीवरून दोन गटात तुंबळ हाणमारी झाली.
उपसरपंच पदासाठी मतदान केल्याने फुटलेल्या सदस्यांना मारहाण करण्यात आली. तरटेवाडी आणि सिरसमार्गच्या ग्रामस्थामध्ये निवडणुकीनंतर मारहाण आणि दगडफेकीचे प्रकार घडले. यावेळी नवनिर्वाचित महिला सरपंचासही मारहाण करण्यात आली. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. सिरसमार्गच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सीमा सुरेश मार्कड यांची बिनविरोध निवड झाली. तर नवनिर्वाचित सरपंचाने मतदान केल्याने उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप पूरस्कृत मेघाताई अनिल पवळ यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण यांचा उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे एक मत फुटले. सिरसमार्ग ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे सहा तर भाजपचे पाच सदस्य आहेत. दरम्यान, विरोधात मतदान केल्यामुळे महिला सरपंचाला देखील मारहाण करण्यात आले आहे.