भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश..

*भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश...
पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले पत्र…
महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबविण्यात आला होता निधी*
राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगांव (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबंधित विभागाला दिले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी ही तातडीने कार्यवाही केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी थांबविण्यात आला होता, तो निधी आता मंजूर झाल्याने कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन भगवान भक्तीगड तसेच जिल्हयातील अन्य विकास कामांबाबत पत्र देऊन निधी मंजूर करण्याची विनंती केली.भगवान भक्तीगडासाठी आपण मंत्री असताना २ कोटी ३५ लाख रूपये इतका निधी मंजूर केला होता. या निधीतील विकासाची अनेक कामे अद्याप पुर्ण झाली नाहीत. या ठिकाणी राष्ट्रसंत भगवानबाबा यांची भव्य मुर्ती तसेच ध्यान मंदिर व स्मारकाचे काम पुर्ण झालेले आहे. मराठवाडयासह महाराष्ट्रातील ऊसतोडणी मजूरांचे श्रध्दास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून या गडाकडे पाहिले जाते. ऊसतोड कामगारांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टातून (वर्गणीतून) ’भगवान भक्तीगडा’ची उभारणी झाली आहे. गडावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी पंकजाताईंनी पत्राद्वारे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निधी मंजूरीचे आदेश दिले. दरम्यान या भेटीत पंकजाताईंनी जिल्हयातील अन्य विकासाचे प्रश्न सादर करत ते सोडवावेत अशी मागणी केली.