बहिरोबावाडीतील चंदन चोरी प्रकरणी कर्जत पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

बहिरोबावाडीतील चंदन चोरी प्रकरणी कर्जत पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
चंदनचोरीचे गूढ लवकरच उकलणार – पो. नि. चंद्रशेखर यादव,
कर्जत प्रतिनिधी –
कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी गावाच्या शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या बांधावर असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने या चंदनचोरीचा छडा लावण्याचे आव्हान कर्जत पोलिसांसमोर होते. मात्र कर्जत पोलिसांनी हे आव्हान स्विकारत या गुन्ह्य़ातील दोन आरोपींना जेरबंदही केले असल्याने शेतकऱ्यांकडून कर्जत पोलिसांचे कौतुक होत आहे.
अशोक निवृत्ती जाधव वय-३३ (रा.कोरेगाव,ता.कर्जत), अस्लम चाँद पठाण वय-३३ (रा.म्हसोबा गेट कर्जत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संजय बबन लाळगे (रा.बहिरोबावाडी) यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली होती. फिर्यादीचे बहिरोबावाडी शिवारात गट क्र.२०७ मध्ये पाच एकर क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रात चंदनाची ३६० झाडे आहेत आणि याच शेताच्या बांधावर ६ झाडे लावलेली आहेत. (दि.२० रोजी) शेतात पाणी देताना रात्री ९ वाजता फिर्यादीने ही सर्व झाडे पाहिली होती तेंव्हा व्यवस्थित होती मात्र, दुसऱ्या दिवशी (दि.२१ रोजी) सकाळी शेतात गेल्यावर पाहिले असता ६ झाडांपैकी एक चंदनाचे झाड कापून टाकले होते तर एक झाड कापून नेले असल्याचे निदर्शनास आले.या एका झाडाची किंमत १५ हजार तसेच १५ किलो वजनाचे दुसरे झाड त्याची अंदाजे किंमत १५ हजार रुपये एवढी आहे. एवढेच नाही तर फिर्यादी संजय लाळगे यांनी बहिरोबावाडी गावातील सुनिल मारुती यादव यांचे देखील एक चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले असुन राहुल रामचंद्र शिंदे यांच्या शेतातीलही एका झाडाचे चोरट्यांनी कापून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी करून चोरटे त्याची तस्करी करत आहेत. या बाबीकडे कर्जत पोलिसांनी लक्ष घातले असून आता या कारवाईमुळे चंदनचोरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आरोपी अशोक जाधव याची चार दिवस पोलीस कोठडी मिळाली होती तर आरोपी असलम चांद पठाण याचीही आता 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर गुन्ह्यात आणखी काही आरोपी फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे..
ही कारवाई पोलीस पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, उद्धव दिंडे, सुनील खैरे, गोवर्धन कदम, जयश्री आणि गायकवाड आदींनी केली आहे.