श्रीरामपूर तालुका पोलिसांनी खैरी शिवारात गावठी कट्टा सर जिवंत काडतुससह एकास पकडले

श्रीरामपूर तालुका पोलिसांनी खैरी शिवारात गावठी कट्टा सर जिवंत काडतुससह एकास पकडले
श्रीरामपूर तालुका पोलिसांनी निमगाव खैरी शिवारात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास पकडले. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे (रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्यावर यापुर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
तालुक्यातील खैरी निमगाव येथील प्रशांत उर्फ पांडू साईनाथ लेकुरवाळे हा गावठी कट्टा बाळगतो, तसेच तो खैरी निमगाव ते चितळी जाणार्या रोडवरील साई समर्थ मंगल कार्यालयाजवळ आहे, अशी खात्रीशीर माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना गुप्त बातमीदाराने दिली होती. त्यावरून श्री. खाडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस नाईक श्री. शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे व चालक पोलीस कॉन्स्टेबल चांदभाई पठाण हे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खैरी निमगाव ते चितळी जाणार्या रोडवर साई समर्थ मंगल कार्यालयाजवळ गेले असता त्यांना एक इसम उभा दिसला पोलिसांना पाहून तो पळू लागला असता पोलिसांनी त्याचेवर झडप घालून पकडले. पोलिसांनी त्याचे नाव गाव विचारले असता त्याने प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे (रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 20,000 रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा व 1000 रुपये किंमतीचे जिवंत काडतुस असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी पंचासमक्ष हा मुद्येमाल जप्त केला.
या घटनेवरुन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे (रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द रजि. नंबर 210/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे पुढील तपास करीत आहेत. आरोपी प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे यांच्यावर श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन तसेच नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे येथे यापुर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिद्र खाडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस नाईक श्री. शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे व चालक पोलीस कॉन्स्टेबल चांदभाई पठाण यांनी सदरची कारवाई केली.