सेवा सोसायटी, जिल्हा बँकेने पशुखाद्य व पीककर्ज रोखल्याने शेतकऱ्यांचे उपोषण: खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची तारांबळ

सेवा सोसायटी, जिल्हा बँकेने पशुखाद्य व पीककर्ज रोखल्याने शेतकऱ्यांचे उपोषण: खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची तारांबळ
मढेवडगाव सेवा सोसायटी, जिल्हा बँकेने पशुखाद्य व पीककर्ज रोखल्याने शेतकऱ्यांचे उपोषण: खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची तारांबळ : जिल्हा बँकेने सहाय्यक निबंधक कार्यालयाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले.
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२५: श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी व जिल्हा बँकेच्या मढेवडगाव शाखेचा अजब कारभार सुरू असल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सभासद शेतकऱ्यांना कर्ज मागण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यापासून जाणूनबुजून रोखले जात असल्याने वंचित सभासद शेतकऱ्यांनी पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. ३१ रोजी उपोषण आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार डॉ.योगीता ढोले, सहाय्यक निबंधक अभिमान थोरात व जिल्हा बँकेचे विस्तार अधिकारी वसंत जामदार यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण आंदोलन मागे घेतले.
तहसीलदार मिलिंद कुलथे यांना दिलेल्या निवेनात आंदोलनकर्त्यानी म्हटले आहे की मढेवडगाव सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून दि.१८ जून रोजी मतदान आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी अंतर्गत राजकारणाला सुरुवात करून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर विरोधक सभासदांना कर्जवाटपापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ३१ मार्च पूर्वी ३१० सभासदांनी विहित वेळेत कर्जाची परतफेड केली आहे व जिल्हा बँकेने कर्जफेड केल्यावर तात्काळ कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सेवा सोसायटीने जिल्हा बँकेच्या आदेशाला हरताळ फासून मर्जीतील ३५ सभासदांना कर्जवाटप व एकाच कुटुंबातील पाच पाच व्यक्तींना कर्जवाटप करून संस्थेच्या संहितेला बाधा आणून बाकी नियमात बसणाऱ्या ३१० सभासदांना उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्जापासून वंचित ठेवण्याचा अजब प्रकार चालू केला आहे. सभासद शेतकऱ्यांना खरिप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, औषधे व शेतीच्या मशागतीसाठी पैशाची अत्यंत गरज आहे. पण सोसायटीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवावी लागेल. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, सहाय्यक निबंधक अभिमान थोरात व जिल्हा बँकेचे विकास अधिकारी वसंत जामदार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून कर्ज वाटप करण्याचे आदेश दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार,नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गिरमकर, डॉ. दत्तात्रय नागवडे, पोपट गोरे,गेना मांडे, साहेबराव उंडे, प्रवीण वाबळे,उपसरपंच दीपक गाडे, अमोल गाढवे, संतोष मांडे, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय गोरे, भाऊसाहेब पवार, अनंता पवार, किशोर इरोळे, तुकाराम उंडे, संदीप मांडे, विजय हरिहर, प्रशांत शिंदे, लक्ष्मण मांडे, महेंद्र उंडे, गणेश उंडे, गणेश वाबळे, युवराज साळुंके उपस्थित होते.
चौकट: गेणाभाऊ मांडे, सभासद शेतकरी – “संस्थेने राजकीय उद्देशाने सभासद शेतकऱ्यांचे कर्ज रोखून शेतकऱ्यांसाठी असलेल्या संस्थेच्या हिताला धक्का दिला आहे. संस्थेचे कापड विभाग, मशिनरी विभाग बंद पडला आहे तर खत विभाग व स्वस्त धान्य दुकान बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गैरव्यवहार प्रकरणी गेल्या पाच वर्षात चार संचालक व सचिव निलंबित होऊनही संस्था मात्र पारदर्शक कारभाराचा डंका पिटत आहे. आमच्यावर अन्याय केला तर कायदेशीर लढाई करू.”
चौकट: वसंत जामदार, तालुका विकास अधिकारी” जिल्हा बँकेच्या ध्येय धोरणानुसार बँक कर्ज वाटप करत आहे. कुणाही पात्र सभासदांची येथून पुढे अडवणूक होणार नाही. याची दक्षता घेऊन उपोषणकर्त्यांनी बँकेला व संस्थेला सहकार्य करावे व उपोषण स्थगित करावे.