सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी वाटप

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी वाटप
*आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून लाभार्थ्यांना विशेष लाभ*
कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) – कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून तसेच कर्जत तहसील कार्यालय आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या विशेष सहकार्यातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष मोहीमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वाटप कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जत येथील समर्थ विद्यालय करण्यात आला. ज्यामध्ये कर्जत व जामखेड अशा दोन्ही तालुक्यातील 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले. या मोहिमेतुन समाजातील प्रत्येक घटकाला सहाय्य करण्यासाठी शासनाने आखलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ अनुदान योजना या सर्व योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देवून आतापर्यंत रोहितदादा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील 7 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.
रोहित पवार आमदार होण्यापूर्वी मागील दहा वर्षात जेवढ्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लाभार्थ्यांना रोहितदादा आमदार झाल्यापासून गेल्या दोन वर्षात या योजनेचा लाभ मिळाला आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेशाचे वाटप केल्यानंतर आता कर्जत तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना एकत्रित 30 लाख 80 हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य शासनाच्यावतीने वाटप केले जाणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना दैनंदिन आयुष्यात मदत व्हावी म्हणून सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. आमदार रोहित पवार यांचे अशा सर्वांना शासनाच्या माध्यमातून लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. आमदार म्हणून (ऑक्टो 2019) निवडून आल्यानंतर रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून लाभ देण्यात आले. या योजनांतून एकही गरजू नागरिक वंचित राहू नये यासाठी रोहितदादांनी विशेष प्रयत्न केले. या विशेष शिबिरासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे आणि गटविकास अधिकारी अमोल जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मंचावर कर्जत पंचायत समितीच्या सभापती मनिषा जाधव, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, उपाध्यक्षा रोहिणी घुले, गटनेते संतोष मेहेत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, बापुसाहेब नेटके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष खराडे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी कर्जत जामखेड तालुक्यात आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून करण्यात आली. या योजनेत आतापर्यंत कर्जतचे 606 लाभार्थी पात्र ठरले आहेत. हा आकडा सोमवारी नोंदणी झाल्यामुळे आणखी वाढणार आहे. नगर जिल्ह्यात वात्सल्य व बालसंगोपनमध्ये कर्जत व जामखेड तालुका लाभार्थ्यांच्याबाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनाकाळात आपले पती गमावलेल्या महिलांना व पालकांचे छत्र हरवलेल्या आणि संरक्षणाची गरज असलेल्या निराधार मुलांना वात्सल्य व बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाते.
सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत आणि व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल यासाठी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कायमच प्रयत्न करत असतो आणि यापुढेही प्रयत्न करत राहणार – आमदार रोहित पवार