
- पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांकडून तक्रार अर्ज लिहून घ्यायचा आणि चौकशी करू आहे, असं म्हणत त्यांची बोळवण करायची, याचा प्रत्यय नागरिकांना अनेकदा येतो. मात्र आता नगर पोलिसांनी नवा फॉर्म्युला अवलंबण्यास सुरुवात केली असून तक्रारीत तथ्य असेल तर अर्ज न घेता थेट गुन्हाच दाखल करायचा हा नवा फॉम्युला पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुरू केला. याचा परिणाम म्हणून नगरचे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढलं असून याबाबतीत जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आहे. मात्र, चौकशी अर्जांची संख्या कमालीची घटली असून त्याचे चांगले परिणाम भविष्यात दिसू लागतील, अशी माहिती मिळाली
पोलीस अधीक्षक पाटील यांनी सरत्या वर्षातील पोलिसांच्या कामगिरीची माहिती दिली. नगर जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांत सरत्या वर्षात तब्बल १२ हजार २५२ गुन्हे दाखल आहेत. तसंच अदखलपात्र गुन्हे, चौकशी अर्ज व अन्य मिळून ४० हजारांवर गुन्हे आहेत. त्यातील ५१ हजार ७२१ गुन्ह्यांचा निपटारा झाला आहे. वर्षभरात जिल्ह्यात ५६ दरोडे पडले आहेत, ते सर्व उघडकीस आणण्यास यश आलं आहे. घरफोडीच्या ७९६ पैकी १२१ गुन्हे उघड झाले आहेत.
चोरीच्या तीन हजार ९२ गुन्ह्यांपैकी ७०२ गुन्हे उघड झाले असून हे प्रमाण मात्र कमी आहे. जिल्ह्यात विविध प्रकारचे संघटित गुन्हे करणार्या तब्बल ४०१ टोळ्या आहेत. त्यातील १६ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा शस्त्राचा वापर आणि गुन्हेही वाढले आहेत. पोलिसांनी ४३ गावठी कट्टे, ६७ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. याशिवाय ४२ तलवारी, चार कोयते, ११ सुरे जप्त करून एकूण ५५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अवैध वाळू उपसा व वाहतुकीशी संबंधित १६९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मालमत्तासंबंधीच्या विविध गुन्ह्यांत पोलिसांनी २८५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २० कोटी ८५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, गुन्हे दाखल होण्यात नगरचा राज्यात प्रथम क्रमांक आहे. त्याबद्दल सांगताना पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात केवळ अर्ज स्वीकारू नका तर थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश दिले होते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षभरात ३३ पोलीस ठाण्यांत मिळून ५ हजार २०६ अर्ज दाखल झाले होते. सरत्या वर्षात फक्त ७०६ अर्ज दाखल झाले आहेत. याचं कारण म्हणजे त्यांचे थेट गुन्हे दाखल केले गेले आहेत. यातून नागरिकांना दिलासा मिळतो. गुन्हेगारांवर कारवाई करता येते आणि याचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येतात, असंही पाटील म्हणाले.