तनपुरेंनी जिरवाजिरवीचे राजकारण सोडून विकासकामांकडे लक्ष द्यावे- सुरेशराव लांबे

तनपुरेंनी जिरवाजिरवीचे राजकारण सोडून विकासकामांकडे लक्ष द्यावे- सुरेशराव लांबे
राहुरी तालुका/अशोक मंडलिक
ना. तनपुरे नगराध्यक्ष असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे, आंदोलने करीत होते. त्यावेळी त्यांच्यावर मागील सरकारने कधीच गुन्हे दाखल केले नाही. सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा कळवळा दाखवून आपलेच बगलबच्चांना हाताशी धरून महावितरण कार्यालयावर मोर्चे काढुन आज आम्ही ज्या मागण्या करत आहोत, त्याच मागण्या त्यांनी केल्या होत्या. सत्तेत नसताना त्यांनी शेतकऱ्यांना पुर्वसुचना न देता विद्युत पुरवठा खंडित करु नये, विद्युत पुरवठा सुरळीत करावा, राहुरी ग्रामीण रुग्णालय, गुन्हेगारी विरोधात आंदोलने करून प्रसिद्धी माध्यमांद्वारे भोळ्या भाबड्या जनतेला भुलवून सत्ता मिळविली, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केला आहे.
सत्तेत जाताच या महाशयांनी आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली. यातुन आज विकासकामे, शेतकरी प्रश्न सोडविण्याचे दुरू मात्र गुन्हेगारी धंद्यांना राजकीय पाठबळ देण्याचे काम सुरू केले आहे. यातुन गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार पाहण्यास मिळत आहे. हे वर्तमानपत्रातील प्रशासनाच्या कारभाराच्या बातम्यातुन निदर्शनास येत आहे. तसेच धरण भरलेले असताना पाटपाण्याचे कुठलेच नियोजन नसल्याने धरण उशाला व कोरड घशाला अशी गत राहुरी मतदार संघातील शेतकऱ्यांची झालेली आहे. रब्बी हंगाम संपत आला तरी कनॉल कोरडेच आहेत. दुसरीकडे विहीर, बोअरवेलला पाणी असुनही दोन- तीन महिन्यांपासून विद्युत रोहित्र बंद करून शेतकऱ्यांचे गहु, कांदा, हरभरा, ऊस तसेच चारा पिके पाण्याअभावी जळून चालली आहे. अतिवृष्टी व कारोना सारख्या महामारीत शेतकऱ्यांना आधार देणे तर सोडाच परंतु महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे काम ना. तनपुरेंनी केले आहे.
तसेच प्रसाद शुगर कारखान्याच्या माध्यमातून बगलबच्चे सांगेल तसे शेतकऱ्यांची ऊस तोडणी चालु आहे. यातुन काही गटातील आडसाली ऊस अजुन तोडी अभावी पडुन असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर त्याच गटात सात- आठ महिन्यांचे ऊस तुटून परत खोडे गुडघ्याच्या वर वाढलेले पाहण्यास मिळत आहे. बाहेरचे कारखाने राहुरीतील ऊस घेऊन शेतकऱ्यांना या कारखान्यापेक्षा पाचशे ते सातशे रुपये दर जादा देत आहेत. यातुन असे निदर्शनास येते की, या कारखान्याकडुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यातुन राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बेजार झाला आहे. या पद्धतीने चाललेल्या कारभारामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. या विरोधात आवाज उठविणार्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग ना. तनपुरेंकडुन केला जात आहे. गुन्हेगारांना सोडुन संन्यास्याला फाशी देण्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडत आहे. ते ज्या प्रश्नांसाठी आंदोलने करीत होते ते प्रश्न आजही सुटलेले नसल्याने येणाऱ्या काळात अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या मनोवृत्तीच्या लोक प्रतिनिधीला सत्तेत ठेवणे राहुरीकरांना त्रासदायक ठरणार असल्याने वेळीच मतदारांनी सावध होण्याचे आवाहनही श्री लांबे यांनी केले आहे.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक