मुळा धरणस्थळी जिलेटीन स्फोट घडविण्याचा प्रयत्न

मुळा धरणस्थळी जिलेटीन स्फोट घडविण्याचा प्रयत्न
मुळा धरणाच्या पायथ्याशी राहणार्या बाळासाहेब मंडलिक या तरूणाचा जीव घेण्यासाठी जिलेटीनच्या दोन कांड्याद्वारे दुचाकीचा स्फोट घडविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दुचाकीचे प्लग ठिकाणी जिलेटीन ठेवल्याचे तरूणाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुळा धरणात मासेमारी करण्यासाठी वापरला जाणारा जिलेटीन आता जनसामन्यांचा जीव घेण्यासाठी वापरला जात असल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे. मुळा धरणाच्या पायथ्याशी शेती क्षेत्र असलेला तरूण शेतकरी बाळासाहेब मंडलिक हे आपल्या शेतामध्ये गुरूवारी दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता दुचाकीवर आला होता. सायंकाळी ४ वाजता शेतीमधील सर्व कामकाज आटोपून जनावरांसाठी घास घेऊन तो मुळा धरणाच्या भिंतीवरून घराकडे निघाला. दुचाकी चालू केल्यानंतर धरणाची भिंत चढत असताना गाडी बंद चालू होऊ लागली. मंडलिक याने आपल्या दुचाकीच्या प्लगची पाहणी केल्यानंतर त्यास दोन जिलेटीन कांड्या असल्याचे लक्षात आले. जिलेटीन कांड्याने पेट घ्यावा म्हणून त्याची जोडणी प्लगला केली होती. तरूणाने तात्काळ गाडी उभी करीत राहुल मंडलिक, केशव मंडलिक, जनार्दन मंडलिक, सचिन मंडलिक, बाळासाहेब मंडलिक, अशोक देशमुख यांच्याशी संपर्क साधत मुळा धरण स्थळी बोलविले. दुचाकीतून जिलेटीनच्या कांड्या सुरक्षितपणे काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला.
शुक्रवारी सकाळी पोलिस प्रशासनाला माहिती देताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस हवालदार हनुमंत आव्हाड व चालक साखरे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी जिलेटीन कांड्याद्वारे स्फोट घडविण्याचा प्रयत्न करणार्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष प्रभाकर गाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार, हमिदभाई इनामदार यांनी पोलिस प्रशासनाने घटनेचा सखोल तपास करावा व खरे सुत्रधार शोधून काढण्याची विनवणी केली. या घटनेबाबत जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांसह सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास पवार, लखुनाना गाडे, पंढू तात्या पवार, सोपानराव गाडे, किशोर कोहकडे, संतोष शिंदे, बापुसाहेब मंडलिक, बााबासाहेब मंडलिक, राहुल मंडलिक आदींनी संताप व्यक्त केला आहे. तरूणासह मुळा धरणाच्या सुरक्षिततेला धोका पोहोच करणार्यांचा बंदोबस्त पोलिस प्रशासन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बाळासाहेब मंडलिक यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपींविरोधात तरूणाचा जीव घेण्याचा प्रयत्नासह मुळा धरणाच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—–
मुळा धरण सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
—–
तरूणाच्या दुचाकीच्या प्लगचे कनेक्शन स्पार्क होईल या पद्धतीने लावण्यात आले होते. सुदैवाने स्पार्क न झाल्याने जिलेटीन कांड्या पेटल्या नाही. अन्यथा स्फोट होऊन तरूणाच्या जीवासह मुळा धरणाच्या भिंतीलाही धोका निर्माण झाला असता. मुळा धरण परिसरात मासेमारीसाठी जिलेटीनचा स्फोट घडविला जातो. परिणामी मुळा धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरवणीवर आला आहे.