बदल घडविण्याची खरी ताकद वृत्तपत्रांमध्ये आहे क्रांती फक्त लेखणीच घडवू शकते

बदल घडविण्याची खरी ताकद वृत्तपत्रांमध्ये आहे क्रांती फक्त लेखणीच घडवू शकते
बदल घडविण्याची खरी ताकद वृत्तपत्रांमध्ये आहे. क्रांती फक्त लेखणीच घडवू शकते. त्यामुळे मालकांनी पत्रकारांस एजंट बनवू नये. मी आजही पूर्ण वेळ पत्रकार आहे. तुरूंगात अग्रलेख लिहले. कारण माझ्या रक्तात पत्रकारिता आहे. पत्रकारिता धोक्यात कायम आहे पण आज तिचे हवान आहे. ज्याचं हृदय जळतेय तो लिहू शकतो. आज लोकशाहीची पायमल्ली होत आहे. कारण प्रत्येकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे लेखणीतून समाज एकत्र करण्याचे काम पत्रकारांनी करावे असे प्रतिपादन खा संजय राऊत यांनी केले. ते कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुकाध्यक्ष मेळाव्यात बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष आ रोहित पवार, मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी वसंतराव काणे आणि रंगाआण्णा वैद्य आदर्श पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना खा संजय राऊत म्हणाले की, न्यायासाठी लढणारे खरे सिपाही म्हणजे पत्रकार. मात्र आज बोलण्यावर-लिहण्यावर आज प्रतिबंध आणली जात आहे. अन्यायाच्या विरुद्ध लिहणे आता पत्रकारितेला मारक ठरू लागले. लेखणीतून आवाज उठविला की त्यास तुरूंगात जाऊ लागते. किंवा त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आजच्या राज्यकर्त्यांना असे वाटते की, त्यांनी न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा, पत्रकारिता आपल्या खिशात घातली आहे. कोणी त्यास न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आजच्या घडीला तो गुन्हा ठरविला जातो इतकी भयानक परिस्थिती देशात अलीकडील काळात उभी राहिली आहे.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आ रोहित पवार म्हणाले की, लोकशाही टिकवायची असेल तर पत्रकारांना लिहण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. मात्र आज ते स्वातंत्र्य काही प्रमाणात हिरावले जात आहे. पूर्वी शोध पत्रकारिता असायची सगळ्या बाबी तपासल्यानंतर ती बातमी प्रसिद्ध होत होती. आता ती बंद झाली आहे. ती पत्रकारिता पुन्हा असायला हवी असे आपले सर्वसामान्य नागरिक म्हणून मागणी आहे. समाजासाठी योग्य असणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करणे महत्वाचे आहे. सत्य परिस्थिती समोर आणणे ही पत्रकारितेची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यकर्त्यावर दबाव निर्माण होतो. पत्रकार सुद्धा स्वातंत्र्यवीर आहे. कारण त्यांनी समाज एकत्र करीत देशाच्या जडण-घडणीत लेखणीद्वारे योगदान दिले. सामाजिक प्रश्नावर, बेरोजगारी लिहणे आवश्यक आहे. एकीची ताकद महत्वाची आहे. त्यामुळे पत्रकारांनी एकच संघटन निर्माण करावे. आपल्यातील ताकद ओळखून सामाजिक प्रश्न तडीस लावावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख म्हणाले की, पत्रकार हल्ला विरोधी कायदा अमलांत आणला पण त्याची अंमलबजावणी होत नाही. संबंधित पत्रकाराला न्याय मिळत नाही. पत्रकार पेन्शन हा पत्रकारांचा हक्क आहे. केवळ २% पत्रकारांना ती मिळत आहे. ९८% वंचित आहे. मात्र सरकार याबाबत उदासीन दिसते. पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख यांनी केली. मजेठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी. कर्जतचे प्रेम पाहून भारावून गेलो. एक सुंदर कार्यक्रम संपन्न होत आहे.
प्रास्ताविक करताना संयोजन समितीचे अध्यक्ष गणेश जेवरे यांनी पत्रकारीता करताना येणाऱ्या विविध अडचणी त्यावर मात करीत न्याय देणारा पत्रकार कसा काम करतो यावर प्रकाश टाकला. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, प्राचार्य डॉ संजय नगरकर, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, मन्सूरभाई शेख, विजय जोशी, अरुण कांबळे, रोहिदास हाके, सुभाष गुंदेचा, सूर्यकांत नेटके, अमोल वैद्य, संदीप कुलकर्णी, सर्व सामाजिक संघटनेचे अनिल तोरडमल, मोहन गोडसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष आशिष बोरा, योगेश गांगर्डे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि राज्यातील पत्रकार उपस्थित होते.