कृषीवार्ता

अन्नसुरक्षा तसेच पौष्टीक सुरक्षेसाठी शेतीला जैवतंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे – माजी अध्यक्ष डॉ. मायी, राहुरी कृषि विद्यापीठाचा ५४ वा स्थापना दिन

अन्नसुरक्षा तसेच पौष्टीक सुरक्षेसाठी शेतीला जैवतंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे
– माजी अध्यक्ष डॉ. मायी,
राहुरी कृषि विद्यापीठाचा ५४ वा स्थापना दिन

भारत जमीन, सुर्यप्रकाश, पाणी, हवामान व मजुर या गोष्टींच्या बाबतीत जगाच्या मानाने समृध्द आहे. गेल्या ४० वर्षात जमिनीचे तुकडे पडल्यामुळे खातेदारांची संख्या वाढली. परंतु, सरासरी जमिनीचे प्रमाण कमी झाले. वाढते शहरीकरण, वाढती साक्षरता व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे भारतीय शेतीचा चेहरा बदलला आहे. शेतीमध्ये दिवसेंदिवस मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न वाढत आहे. अशा प्रकारे भारताच्या कृषि क्षेत्रात दोलायमान परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, लोकांमध्ये निर्माण झालेली वैविध्यपूर्ण अन्नाची गरज या प्रश्नांवर उपाय शोधावा लागणार आहे. अन्नाच्या सुरक्षेबरोबरच पौष्टीक सुरक्षेसाठी शेतीला जैवतंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठाच्या ५४ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सी.डी. मायी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते. याप्रसंगी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. दत्तात्रय उगले, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी, डॉ. आर. बी. देशमुख, डॉ. टी. ए. मोरे, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एस. मगर, डॉ. के. ई. लवांडे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. पवार, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, नियंत्रक श्री. सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असण्याच्या काळात या विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गेल्या ५३ वर्षात विद्यापीठाने संशोधनाबरोबरच शिक्षण व विस्तार कार्यामध्ये भरीव योगदान दिले आहे. यामागे आत्तापर्यंत झालेल्या कुलगुरुंबरोबरच सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ व कामगार वर्गाचे परिश्रम आहेत. विद्यापीठातील कास्ट प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना भेटी देता आल्या. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी डिजीटल क्लासरुम तयार करता आल्या. विद्यापीठ प्रक्षेत्रासाठी मुळा धरणावरुन स्वतंत्र पाईपलाईन करुन पाणी आणन्याचे काम पूर्ण झाले असून यामुळे ५०० एकर पर्यंत पडीक जमीन सिंचनाखाली येवून विद्यापीठाच्या महसूलात वाढ होणार आहे. आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शोधप्रबंधावर आधारीत व्यावसायीक पध्दतीने विचार करुन व्यवसाय कसे तयार होतील याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यापीठातील प्राध्यापकांनी प्रकल्प तयार करुन जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठातील प्रत्येकाने आपले काम जबाबदारीने, तत्परतेने, पूर्ण समर्पणाने केले तर आपण सर्व क्षेत्रात भरीव योगदान देवू शकू असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार डॉ. उल्हास सुर्वे (पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरी), डॉ. आनंद जाधव (कृषि महाविद्यालय, पुणे), डॉ. अभयकुमार बागडे (कृषि महाविद्यालय, कोल्हापूर), डॉ. संदीप पाटील (कृषि महाविद्यालय, धुळे) यांना देण्यात आला. उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार कसबे डिग्रज येथील सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांंना देण्यात आला. उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापक हा पुरस्कार वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. नरेंद्र काशीद यांना देण्यात आला. उत्कृष्ट संशोधन केंद्र (मोठा गट) पुरस्कार पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला तर उत्कृष्ट संशोधन केंद्र (लहान गट), राहुरी येथील आखिल भारतीय समन्वीत भुईमुग सुधार प्रकल्पाला देण्यात आला. यावेळी विद्यापीठातील बेकरी युनिटमध्ये तयार केलेल्या नानकटाई/कुकिज या बिस्कीटांना पेटंट मिळाल्याबद्दल अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यापीठ अभियंता श्री. कारभारी ढवळे यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यापीठाचे गीत तयार केल्याबद्दल विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, डॉ. सचिन सदाफळ व श्री. सिध्दार्थ साळवे यांना यावेळी गौरविण्यात आले. विद्यापीठातील मजुर या पदावर काम करणारे श्री. गणपत थोरात व विशेष अतिथी गृहातील सौ. कल्पना खेडकर यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. प्रमोद रसाळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने पार पडला.

‘ना खंत ना खेद’

दरम्यान स्थानिक मंत्री ना. तनपुरे यांना या महत्वाच्या स्थापना दिन कार्यक्रमात डावलले या प्रकाराची विद्यापीठाचे कुलगुरू व प्रशासनाकडून ‘ना खेद ना खंत’ व्यक्त करण्यात आला नाही
मात्र या प्रकाराचा तालुक्यातील शेतकरी, कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे