नगर, नेवासा व पारनेर तालुक्यातील मुळा धरण कृती समितीच्या संघर्षाची जाणिव

नगर, नेवासा व पारनेर तालुक्यातील मुळा धरण कृती समितीच्या संघर्षाची जाणिव आहे. लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत कृती समितीच्या सदस्यांची चर्चा घडवून आणत धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विश्रामगृहामध्ये राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते धरणग्रस्त कृती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर गाडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले की, गाडे यांच्या निवडीचा नक्कीच लाभ धरणग्रस्त कृती समितीला होणार आहे. बारागाव नांदूर गावाच्या विकासामध्ये बहुमुल्य योगदान असलेले गाडे यांच्याकडे प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुराव्याची मोठी ताकद आहे. तर लवकरच धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयातून प्रयत्न केला जाणार आहे. धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन तनपुरे यांनी केले.
यावेळी धरणग्रस्त कृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रभाकर गाडे यांनी सांगितले की, राज्यमंत्री तनपुरे यांच्या नेतृत्वामध्ये धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविला जाणार असल्याचा आपणास ठाम विश्वास आहे. तिन्ही तालुक्यातील धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे सांगितले. यावेळी धरणग्रस्त कृती समितीचे नेवासा तालुक्यातील उपाध्यक्ष ठकाजी बाचकर, सचिव संतोष बोरूडे, आण्णासाहेब खिलारी, कोंडीराम बाचकर, पोपट बाचकर, गोरक्षनाथ बाचकर, जब्बार पठाण, भाऊसाहेब बाचकर, दत्तु डहाळे, अमजत पिरजादे यांनी गाडे यांच्या निवडीचे समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी सुनिल अडसूरे, माजी उपसरपंच जिल्लूभाई पिरजादे, भागवत झडे, विजय तापरे आदींची उपस्थिती होती.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक