फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) बारावे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

*फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) बारावे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न – नाशिक येथील प्रा. डॉक्टर सुदेश घोडेराव यांची राष्ट्रीय सचिवपदी पुन्हा निवड*
फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) बारावे राष्ट्रीय अधिवेशन तर्कशील सोसायटी पंजाब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 आणि 30 ऑक्टोबर 2022 दरम्यान बरनाला, पंजाब येथे ‘अंधश्रद्धे पासून स्वातंत्र्य’ या मुख्य संकल्पनेवर नुकतेच संपन्न झाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रोफेसर अरविंद, कुलगुरू, पंजाबी यूनिवर्सिटी, पतीयाला यांनी म्हटले की सद्यस्थितीमध्ये माहिती असलेले जग आणि ज्याची माहिती नाही असे जग अस्तित्वात असल्याने त्याचा उलगडा करण्याचे कार्य विज्ञान करते म्हणूनच विज्ञानात अंतिम सत्य नसते तर ते नेहमी उत्क्रांत आणि बदलत होत असते. विज्ञानाच्या प्रगतीसाठी तर्क, प्रयोग आणि पडताळा हे प्रमुख तीन आधारस्तंभ आहेत. कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे मा. उत्तम निराऊला, नेपाळ येथील सोच या सामाजिक संस्थेचे आणि ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल या लंडनस्थित जागतिक संस्थेचे पदाधिकारी म्हणाले की जगामध्ये भारत हा एकमेव प्रचंड विविधता असलेला देश असून भारतीय संविधान हे सर्वोत्तम आहे. स्वतःला विशिष्ट धर्माचा व्यक्ती म्हणवून घेणार्यां ऐवजी मानवतावादी किंवा निधर्मी म्हणवून घेणाऱ्यांची संख्या जगामध्ये वाढते आहे. भारतात विवेकवादी विचारांचा जागर ‘फिरा’ सारख्या राष्ट्रीय संघटनेकडून होत आहे ही अभिमानाची बाब आहे. हा जागर अधिक प्रखर करण्यासाठी युवकांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रतिगामी शक्तींचा प्रभाव भारताप्रमाणे नेपाळमध्येही वाढत आहे. त्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोच्या माध्यमातून आवाज उठवणे आवश्यक आहे. विद्यापीठांमध्ये मानवी मूल्यांचा जागर करण्यासाठी उपक्रम असणे गरजेचे आहे. शिक्षणाचे होणारे भगवेकरण धोक्याचे आहे म्हणून शैक्षणिक क्षेत्रात देखील विवेकवाद जोपासला गेला पाहिजे.
या अधिवेशनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, फिराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र नायक यांनी अध्यक्षीय भाषण, राष्ट्रीय सचिव प्रा डॉ सुदेश घोडेराव यांनी अधिवेशनाची संकल्पना, खजिनदार हरचंद भिंदर यांनी आभार, तर तर्कशील सोसायटी पंजाबचे प्रमुख हेमराज स्टेनो यांनी स्वागत आणि संयोजक जसवंत मोहाली यांनी सुत्रसंचलन केले.
भारताच्या 20 राज्यातील 25 संघटनांचे 400 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये एकुण चार सत्रामध्ये चार विविध संकल्पनावर चर्चासत्रे आणि संघटनाअंतर्गत दोन चर्चासत्रे संपन्न झाली. पुढील दोन वर्षासाठी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नाशिक येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समन्वय विभागाचे कार्यवाह प्रा. डॉक्टर सुदेश घोडेराव यांची राष्ट्रीय सचिव म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल विविध स्तरांवर त्यांचे अभिनंदन होत आहे.