सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी शिक्षकांची – रणवीर पंडित*

*सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी शिक्षकांची – रणवीर पंडित*
*गढीच्या अध्यापक महाविद्यालयात बी.एड च्या विद्यार्थ्यांना निरोप*
शिक्षण क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. परिस्थिती बदलली आहे. शिक्षकांना केवळ विध्यार्थ्यांसोबत नाही तर पालकांसोबत संवाद वाढवण्याची गरज आहे. सकारात्मक सवांद कौशल्य आता शिक्षकांनी आत्मसात करावीत. कारण सामाजिक परिवर्तन करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. असे प्रतिपादन रणवीर अमरसिंह पंडित यांनी केले.
गढी येथील अध्यापक महाविद्यालयात बीएड च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.२७) निरोप देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गेवराईचे पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, प्राचार्य डॉ. अर्जुन मासाळ, प्राचार्य वसंत राठोड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना रणवीर पंडित म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात अनेक नवे कायदे, नवे नियम आले आहेत. पूर्वी छडीचा वापर असे, शिक्षक वेळप्रसंगी रागावत होते. परंतु आता रागावले किंवा मारले तर वाद उद्भवत आहेत. विद्यार्थी, पालक शिक्षकांवर धावत आहेत अशा वेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना समजेल, आशा भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे. आता शिक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण, कल ओळखून त्यांच्या क्षेत्र निवडीसाठी शिक्षकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यावर आणि त्यांच्या क्षमता आणि सामर्थ्य ओळखण्यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे. कारण स्पर्धा वाढली आहे, आणि सामाजिक परिस्थिती बदलत आहे. हा बदल सकारात्मक होण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले.
पोलीस निरीक्षक पेरगुलवार म्हणाले की, तुम्ही केवळ पगारासाठी नोकरी हे उद्दिष्ट ठेऊ नका, उद्याचा समाज कसा असेल हे ठरवण्याचे आणि तो तसा घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे. तुम्ही बीएडचे शिक्षण घेण्यासाठी पात्रता परीक्षा दिली तेव्हा तुमच्यातील क्षमता तुम्ही दाखवली. आता महाविद्यालयातुन बाहेर पडताना तुम्ही प्रशिक्षित झालात म्हणजे आता तुम्ही जबाबदारी घ्यायला सज्ज झाला आहात. चांगला विद्यार्थी घडवताना चांगला माणूस कसा घडेल याचे भानही तुम्ही ठेवा. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही काळजी करू नका. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकतात. नोकरी मिळाली नाही म्हणून खचून जाऊ नका, करण्यासारखं खूप काही आहे. उद्योग व्यवसाय करू शकतात. चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. मासाळ यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांचे कौतुक करत चांगलं करियर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुकुंद लांडगे, सचिन मंदे, गंगा करपे, आकाश आडे या विद्यार्थी प्रतिनिधीनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कीर्ती खरात आणि अनुजा खरात यांनी केले. आभार प्रा. ज्ञानदेव गवळी यांनी मानले. यावेळी
प्रा. गायकवाड ए. आर., प्रा. लकडे एन. आर., प्रा. कोकाटे के.सी., प्रा. सुतार जे.एस. यांच्यासह मोठ्या संख्येने छात्रअध्यापक, छात्र अध्यापिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.