*सरपंच बांधवांनो, गांवकऱ्यांनी दिलेल्या संधीचे सोने करा… | अभी नही तो कभी नही.

*सरपंच बांधवांनो, गांवकऱ्यांनी दिलेल्या संधीचे सोने करा… | अभी नही तो कभी नही.
दर पाच वर्षांनी निवडणूका होतात, मात्र पाच वर्षे ज्या आशेने मतदारांनी निवडून दिलंय त्यावर कितीजण खरे उतरतात हा एक प्रश्नच आहे. बहुसंख्य ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की, गांवकरी विकास होईल या आशेने वाट पाहत बसतात मात्र ५ वर्षे संपूण जातात मात्र विकास तर सोडाच आहे त्यापेक्षाही गावाची दयनिय अवस्था झालेली असते. गांवकऱ्यांच्या मनात राग उत्पन्न होण्यापेक्षा गांवकऱ्यांनी काम चांगले होत आहे म्हणून आशिर्वाद द्यावा, गल्लीत आगमन झाल्यावर काटे नव्हे तर फुलांनी स्वागत व्हावे अशी परिस्थिती निर्माण होणे आवश्यक आहे. नव्या सरपंचांकडून अशाच काही अपेक्षा….
नुकतंच महाराष्ट्रात असंख्य ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपन्न होवून सरंपच व सदस्य म्हणून अनेक बंधू आणि भगीनी निवडून आले आहेत. अर्थातच अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पहायला मिळाल्या आहेत. ज्या प्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीमध्ये चूरस पहायला मिळते कदाचित त्यापेक्षाही जास्त अटीतटीच्या लढती यावेळेस पहायला मिळाल्या आहेत. सर्व सरपंचांना पुढील वाटचालीच्या दृष्टीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
सन्माननीय सरपंच बांधवांनो आणि भगीनींनो, सर्वसामान्य नागरिकांनी अर्थात मतदारांनी मोठ्या आशेने आपणास निवडून दिले आहे. कदाचित आपल्यालाही निवडून येणार किवा नाही याबाबत साशंकता असेल. परंतू आपले योग चांगले म्हणा किंवा गांवकऱ्यांनी आशिर्वाद दिला म्हणा, त्यामुळे आपण सरपंचपदी विराजमान झालात. अर्थात सरपंच पद हे खूप मोठे व जबाबदारीचे पद आहे याची जाणीव आपण ठेवणे आवश्यक आहे.
*लोकांना काय लागतंय* ?
सर्वसामान्य मतदार आपल्याला निवडून देतात, त्यांची अपेक्षा नेमकी असते काय हे आपण समजून घेतले पाहीजे. खरं तर सर्वसामान्य लोकांना गल्लीतले रस्ते चांगले हवे आहेत. तुंबलेल्या नाल्या नेहमी काढल्या जाव्या आणि नाल्यातील पाणी वाहते करावे, घंटागाडी द्वारे घराघरातून कचरा उचलला जावा, गल्लीतील कचरा उचलून बाहेर लांब टाकण्यात यावा, पिण्यायोग्य स्वच्छ पाणी प्रत्येक घराला नळ कनेक्शन द्वारे नियमित मिळावे, ग्रामपंचायतचे विविध प्रमाणपत्र त्वरित मिळावेत, शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा असे सहज आणि लवकर मार्गी लागणारे प्रश्न आहेत.
*स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या*…
गावात अस्वच्छता, घाण व दुर्गंधीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी नसेल तर कोणत्याही विकास निधीतून किंवा सामुहिक योगदानातून एक घंटा गाडी आणा, गाव मोठे असेल तर किमान २ घंटागाडी आणा, जर गाव मोठे असेल आणि यापूर्वीची 1 घंटागाडी असेल तर पुन्हा एक घंटागाडी आणून संपूर्ण गावातील कचरा दररोज उचलण्याचे नियोजन करा. नियमितपणे नाल्या काढा, नाल्या वाहत्या करा, गल्यांमधील नाल्यातील पाणी रस्त्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
*शासनाच्या निधीचा वापर* :-
केंद्र आणि राज्य सरकारच्या असंख्य योजना असतात, सदरील योजना आणि विकास कामांसाठी वर्षाला लाखों किंबहुना मोठी ग्रामपंचायत असल्यास कोटीच्या खरात निधी येत असतो. मात्र सदरील फंड अथवा निधीचा वापर योग्यरित्या न केल्यामुळे गावाची परिस्थिती जैसेथेच राहते. त्यामुळे शासनाच्या विविध योजना आणि विकास कामांचा निधी योग्य रित्या आणि इमाने इतबारे वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
*माहिती नसेल तर करून घ्या* !
ग्रामपंचायतला निधी कोठून येतो, योजना कोणत्या आहेत, जिल्हा परिषद काय असते, पंचायत समिती काय असते, जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये कोणकोणते विभाग असतात, गावात योजना राबवण्यासाठी आणि विविध विकास कामे करण्यासाठी कोणाला भेटावे लागते, याची माहिती असणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये कोणकोणते पद असतात आणि त्यांचे कार्य काय असते याची पुस्तके सुध्दा आपल्याला कोठेही मिळून जातील. एवढंच काय गुगल वर किंवा युट्यूब वर सुध्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती बाबत सविस्तर माहिती मिळून जाईल. फक्त माहिती नसणे एवढ्या एका कारणामुळे बऱ्याचदा परिस्थिती जैसेथेच राहून जाते, त्यामुळे दररोज काही न काही माहिती घेत चला.
*समृध्द गावांची माहिती घ्या*….
महाराष्ट्रात हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अशी अनेक गावे आहेत ज्यांनी सर्वांच्या सहभागाने गावाचा विकास करून दाखवला आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षणासह रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले त्यामुळे या गावांचा सर्वांगिण विकास होवू शकला. या गावांनी कशाप्रकारे हे साध्ये केले हे पाहण्यासाठी शक्य असल्यास या गावांना भेटी सुध्दा द्यायला हरकत नाही.
*ग्रामसभा नियमित घ्या*….
सर्वसामान्य मतदार अर्थात नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्यात, भविष्यात गावात कोणती विकासकामे करायची आहेत, कोणत्या योजना राबवायच्या आहेत याबद्दल गांवकऱ्यांच्या भावना आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची आहे. ग्रामसभेला विशेष अधिकार प्राप्त असतात, वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे बंधनकार असतात, मात्र शक्य असल्यास 6 पेक्षा जास्त ग्रामसभा घेतल्यास नागरिकांनाही आपले मत सहज मांडता येईल.
*भ्रष्टाचाराला दूर ठेवा*…
ज्या ग्रामपंचायती मध्ये भ्रष्टाचार होतो, त्या ग्रा.पं. अंतर्गत गावात विकास कामे योग्य पध्दतीने आणि चांगल्या दर्जाची होवूच शकत नाहीत. सगळे मिळून थोडं थोडं खावू लागले तर योजना किंवा विकास कामासाठी पैसाच उरत नाही, किंवा शिल्लक असलेल्या पैशात चांगल्या दर्जाचे काम होवूच शकत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार मी करणारही नाही आणि कुणाला करू देणारही नाही ही मानसिकता ठेवणे आवश्यक आहे. आता सगळं ऑनलाईन झालेले आहे, त्यामुळे भ्रष्टाचार केला असेल तर तो कधी न कधी उघड होणारच आहे, त्यामुळे भविष्यात भ्रष्टाचाराचा डाग लावून घेण्यापेक्षा आणि गुन्हा दाखल होण्यापेक्षा भ्रष्टाचाराला दूर ठेवलेलेच बरे…
*शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर घ्या*…
ग्रामीण क्षेत्रात बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो, मात्र बऱ्यावेळा शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, त्यासाठी आधुनिक पध्दतीचे प्रशिक्षण जर शेतकऱ्याला मिळाले तर त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होवू शकेल. राज्यात अनेक असे शेतकरी आहेत जे लाखो किंबहुना कोटीचे उत्पन्न शेतातून घेतात, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करावा, अर्थात तसे शिबीर गावात आयोजित करावे किंवा गावातील काही युवकांना तशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी पाठवावे.
*युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न व्हावेत*…
गावात असंख्य बेरोजगार युवक-युवती असतात, त्यांच्या हाताला काम नसते, अशावेळी त्यांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य होणे आवश्यक आहे. गावात छोटे किंवा गृहउद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून बँकाकडून कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. जसे आपण स्वत:चे काही काम अडकल्यास प्रयत्न करतो तसेच इतरांसाठीही प्रयत्न केल्यास त्याचे नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील.
*पक्ष-गट-तट विसरा*…
निवडणूका असे पर्यंत पक्ष, पॅनल, गट तट असते, मात्र निवडणूका संपल्यावर सगळे आपलेच आहेत या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. निवडून आल्यावर आपण सरपंच एखाद़्या पक्षाचे किंवा पॅनलचे राहत नाहीत, म्हणजेच आपण राहत असलेल्या सगळ्या गावाचे सरपंच असतात, निवडणूकीत दुसऱ्या पॅनलचे सदस्य जरी निवडून आले असले तरी ते सुध्दा आपलेच आहेत, त्यांनाही विश्वासात घेवून काम करणे गरजेचे आहे. सरपंच गावाचे प्रमुख असतात, त्यामुळे गावात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा आपलाच आहे ही भावना असणे आवश्यक आहे. एकमेकांवर टिका टिप्पणी करण्यात वेळ वाया घालवू नका, याने असे म्हटले, त्याने तसे म्हटले या भानगडीत पडण्यापेक्षा विकास कामांकडे लक्ष दिल्यास पुढील निवडणूकीत लोक विकास कामांकडे पाहूनच मतदान करतील याचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
*पत्रकारांचे सहकार्य घ्या*…
पत्रकार बांधव वेळोवेळी गावाच्या समस्या आपल्या लेखणीतून तळमळीने मांडत असतात, गावात कोणकोणत्या प्रमुख समस्या आहेत याची त्यांना चांगली माहिती असते, त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. चर्चेतून अनेक गोष्टी समोर येत असतात. शिवाय पत्रकारांनी लिहीलेल्या बातम्यांना नकारात्मकतेने न पाहता त्या बातम्या आपल्याला जागरूक करण्यासाठी आहेत असे गृहीत धरून त्या बातम्यांकडे सकारात्मकतेने पहा.
*सर्व पक्षीय नेत्यांचे सहकार्य घ्या*…
गावाचा विकास करायचा असल्यास त्यामध्ये पक्ष, गट तट विसरून काम करणे आवश्यक आहे. आपल्या गावात कोणत्याही पक्षाचा नेता अथवा पदाधिकारी आल्यास त्यांचा योग्य तो सन्मान करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या, त्यांचे सहकार्य घ्या, विकासकामे करण्यासाठी कधी कोणता नेता कामी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्य असल्यास सर्वांकडे पाठपुरावा करावा. सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेले चांगले संबंध कदाचित गावाच्या विकासासाठी उपयोगी ठरू शकतील.
*जेष्ठांची व युवकांची समिती*…
गावात कोणकोणती विकासकामे करता येतील, शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, कोणते काम गावाच्या हिताचे आहे अशा विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी शक्य असल्यास एक जेष्ठ मंडळींची एक समिती व युवकांची एक समिती बनवल्यास त्याचा नक्कीच फायदा होवू शकेल. जेष्ठ समिती मध्ये गावातील विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते, व्यापारी बांधव, शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअर पत्रकार, इत्यादी घेता येतील. तसेच युवकांच्या समिती मध्ये विविध क्षेत्रातील युवकांना घेता येईल. सदरील दोन्ही समित्या गावाच्या विविध प्रश्नांवर आपल्या सूचना सरपंचांकडे देतील व सरपंच, उपसरंपच व सदस्य मिळून सूचना योग्य असल्यास त्यादृष्टीने प्रयत्न करतील.
*नव्या-जुन्या सर्व सरपंचांसाठी*….
नव्याने निवडून आलेल्या सरपंचासह सध्या कार्यरत असलेल्या सर्व सरपंचानी पुढील १ वर्षाचे टार्गेट म्हणजेच लक्ष्य निर्धारित केले पाहिजे. पुढील एका वर्षात मी कोणकोणती विकास कामे करणार आहे, कोणकोणत्या योजना राबवणार आहे याचा रोडमॅप तयार करून पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे. आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीला फक्त एकच वर्ष शिल्लक आहे असे गृहीत धरून पुढील वाटचाल केल्यास कामाला अधिक गती मिळेल.
आपल्या हातून काहीतरी चांगलं घडेल या आशेने नागरिक आपल्याकडे पाहत आहेत, आपण गावाचा कायापालट कराल ही गांवकऱ्यांची भावना आहे. अपेक्षा आहे की, आपण मिळालेल्या संधीचे सोने कराल आणि गावाचा सर्वांगिण विकास कराल. “अभी नही तो कभी नही” या वाक्याप्रमाणे वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ गावाच्या सर्वांगिण विकासासाठी खर्च कराल हीच माफक अपेक्षा… धन्यवाद…
*नवीन वर्ष आपणास व समस्त नागरिकांना सुख, समृध्दी, आरोग्यदायी, आनंदाचे व प्रगतीचे जावो, हीच सदिच्छा… नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा*….
*सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही*…
*सारी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए*….
*मेरे सिने में नही तो तेरे सीने में सही*…
*हो कहीं भी आग लेकीन आग जलनी चाहिए*…