आनंदवार्ता ; अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर आष्टीपर्यंत धावली रेल्वे
लवकरच होणार पुढील काम
आनंदवार्ता ; अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर आष्टीपर्यंत धावली रेल्वे
गेवराई प्रतिनिधि गणेश ढाकणे 8888435869
बहुप्रतिक्षीत अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील 61 कि.मी. पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर बुधवारी अहमदनगर ते आष्टीपर्यंत हायस्पीड ट्रायल घेण्यात आली. यामुळे बीड जिल्हावासियांकडून आनंद व्यक्त होत आहे. या ट्रायलवेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते. या परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर कामाने वेग घेतला. यामुळे आष्टी पर्यंतचे रेल्वेचे कामे पूर्ण झाले आहे. एकूण 61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण झाला असून या मार्गावर सोलापूरवाडी हे स्टेशन तयार करण्यात आले आहे. येथून दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी मनोज अरोरा यांच्या हस्ते या स्टेशनवर पूजा करण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण 61 किमी अंतराच्या तपासणीस सुरुवात झाली. यासाठीची मोठी रेल्वे या रुळावर धावली. अधिकारी संपूर्ण रुळाची, पुलांची आणि सर्वांची पाहणी केल्यानंतर आष्टी येथून या हायस्पीड ट्रायलला सुरुवात झाली. यावेळी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. सन 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले होते. दरम्यान, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली.
याकामात राज्य सरकारचा तेवढाच वाटा आहे. नुकताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही राज्य सरकारकडून मोठा निधी या मार्गासाठी मंजूर केला. सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटीच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती. पण बुधवारी सकाळी अहमदनगरवरून आष्टीच्या दिशेने हि रेल्वे धावली. त्यामुळे बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळाले . सोलापूरवाडी, कडा, आष्टी या ठिकाणीहून रेल्वे धावल्यामुळे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.