औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल प्रकल्पाअंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल प्रकल्पाअंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न
– राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत अखिल भारतीय समन्वित औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल प्रकल्पांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक 28 व 29 मार्च, 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ”औषधी व सुगंधी वनस्पतींचे लागवड व तंत्रज्ञान” याविषयी तज्ञांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
यामध्ये औषधी व सुगंधी वनस्पतींचे दैनंदिन आहारातील महत्व तसेच मानवी आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या वनस्पतींचे महत्त्व व त्यांची लागवड विषयक तंत्रज्ञान यावर येणारे विविध रोग व किडी यांची ओळख व त्यांचे योग्यवेळी नियंत्रण करणे व त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने औषधी व सुगंधी वनस्पतींमध्ये माती परीक्षणाचे महत्त्व, जीवाणू संवर्धनाचा वापर इत्यादींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्ये या औषधी वनस्पतींच्या पान व मुळ व पंचांगापासून चूर्ण कसे तयार करावे उदा. शतावरी, अश्वगंधा या वनस्पतींची मुळाद्वारे केले जाणारे चूर्ण व तसेच काडेचिरायत व तुळस या वनस्पतींच्या पंचांगापासून चूर्ण तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या प्रात्यक्षिकामध्ये महिला शेतकऱ्यांनी हिरारीने सहभाग घेतला होता. सुगंधी पिकांमध्ये जिरॅनियम या सुगंधी वनस्पतींची लागवड करून तेल काढण्याची प्रक्रिया याबाबची यशोगाथा सांगून जिरॅनियम लागवडीबद्दल प्रगतशील शेतकरी श्री. रामेश्वर जगताप यांनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शक केले. व तसेच प्रशिक्षणार्थींना औषधी सुगंधी वनस्पती प्रकल्प (धन्वंतरी) येथील गार्डनमध्ये भेट देऊन तेथील विविध प्रकारच्या औषधी वनस्पती प्रत्यक्षात दाखवून त्या वनस्पतींची ओळख व त्या वनस्पतींचे आयुर्वेदातील महत्व व आयुर्वेदिक उपयोग याबद्दलची माहिती धन्वंतरी प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ.विक्रम जांभळे यांच्यावतीने देण्यात आली.
- या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डॉ.तानाजी नरुटे, विभाग प्रमुख वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील महत्त्व विशद करून शेतकर्यांनी औषधी व सुगंधी पिकांच्या लागवडीकडे वळावे असे अहवान केले आहे.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ.तानाजी नरुटे, डॉ.रवींद्र गायकवाड, डॉ.शर्मिला शिंदे, डॉ. भारत पवार, डॉ.विक्रम जांभळे, डॉ.रितू ठाकरे, डॉ.अण्णासाहेब नवले, व प्रगतशील शेतकरी श्री. रामेश्वर जगताप मार्गदर्शन केले प्रसंगी विभागातील डॉ. नंदलाल देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शेवटी डॉ. संजय कोळसे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.