पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी*

*पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी*
राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची निवड झाली, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना लॉटरी लागणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी जिल्ह्यात मराठा कार्ड म्हणून विधान परिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती. भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीतही त्या होत्या. राज्यात मुंडे या ओबीसींच्या भाजपमधील प्रमुख मास लीडर आहेत. त्यांना मंत्रिपदाचा अनुभवही आहे. २०१९ निवडणुकीत मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. या काळात फडणवीस यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना बीड जिल्ह्यात राजकीय बळ दिले. या कारणामुळे फडणवीस व मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. यामुळे मुंडे यांच्या पराभवाला फडणवीसदेखील कारणीभूत असल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली होती. यानंतर मुंडे या कोअर कमिटीतून बाहेर पडल्या.
यानंतर त्यांनी भगवान भक्तिगड आणि गोपीनाथ गडावरून पदापेक्षा लोकांमध्ये काम करण्यात रस असल्याचे सांगितले. त्यांना मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपद मिळाले. राज्यसभा, विधानसभेत संधी मिळेल, अशी अपेक्षा मुंडे समर्थकांना होती; पण तेथेही त्यांना डावलल्याने समर्थकांनी मोठा संताप व्यक्त केला; परंतु त्यांनी मौन बाळगून पक्षाचे काम चालू ठेवले. भाजपच्या बळकटीसाठी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मुंडे आघाडीवर दिसल्या. कोअर कमिटीच्या बैठकीसही त्या उपस्थित होत्या.
धस, पवार दावेदार…!
पंकजा मुंडे या विधानसभा, विधान परिषदेच्या सध्या सदस्य नाहीत. यामुळे नव्या मंत्रिमंडळात आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी यापूर्वी राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला. गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नावाचीही चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. पवार हे दोन वेळा निवडून आले आहेत. यामुळे त्यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.