ही आवडते मज मनापासुनी शाळा*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलाड*
*ही आवडते मज मनापासुनी शाळा*
*गाव खेड्यामध्ये आजही धुळाक्षरं गिरवून घेत वंचित परिघातील लेकरांचा डोळा लिहाया, वाचाया शिकवणारी एकमात्र ज्ञानसरिता असेल तर ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्थात झेडपीची शाळा होय! नगरा – महानगराच्या मातब्बर वस्त्यातील लेकरांना चकचकीत खाजगी संस्थातून दमडा मोजून शिक्षण मिळत असले तरी व्यवस्थेच्या दुष्चक्रात दुरस्थ गावखेड्यातील खिशानं दुबळ्या असणाऱ्यांच्या लेकरांना सहज आणि सुलभरित्या शिक्षण देत आहे ती झेडपीची शाळा ! मात्र हीच शाळा मागील काही काळापासून व्यवस्थेत शिरलेल्या वैगुण्यामुळे विवादाचा विषय ठरली. त्याचे कारण अनेक. तरी आज जिल्ह्यातील अनेक झेडपीच्या शाळा गुणवत्तेचा दर्जा सुधारण्याचा संकल्प करीत परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे या संकल्पनांना अधिकाऱ्यांची प्रेरणा तर मिळालीच पण काही स्थानिक गावकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय पाठबळ दिले. यातूनच या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन शाळा झेडपीची नव्हे तर आपली असा झाल्याची चित्र आहे.*
*पूर्णा काठावर वसलेले बेलाड हे नांदुरा तालुक्यातील एक गाव. या गावातील जिल्हा परिषद शाळेची स्थापना १९५४ साली झाली. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत आज रोजी ४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचा पदभार गेल्या चार वर्षापासून विष्णू येळू घाईट यांच्याकडे आहे तर तंत्रस्नेही शिक्षक श्री संदेश बाबुराव कुऱ्हाडे हे गेल्या चार वर्षापासून या शाळेमध्ये अविरत परिश्रम घेत आहेत.*
*२०१८ साली या शाळेचा पट १७ होता. परंतु या दोन्ही शिक्षकांनी अविरत परिश्रम घेऊन या चार वर्षांमध्ये शाळेच्या गुणवत्तेच्या आधारे पट ४७ पर्यंत नेला. शाळेत नेहमी नवनविन उपक्रम राबविले जातात. शाळेत कृतीयुक्त शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला जातो. मुलांच्या विविध स्पर्धां घेतल्या जातात. दर आठवड्याला माता पालक सभेचे आयोजन केले जातात. यावर्षी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.*
*शाळा,गुरुजी, पालक आणि गावकरी या आदराचे सौख्याचे नातं असेल तर शाळा आदर्श होतेच, याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे बेलाड ची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.*
*शाळेला ग्रामस्थांचा लोकसहयोग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच सरपंच सौ. वैशालीताई सुधाकरराव साबे यांचे मोलाचे सहकार्य आहे.*
*प्रवरेला अमृतवाहिनी म्हणतात जिल्हा परिषदेची शाळा ही ज्ञानाची अमृतवाहिनीच आहे याच ज्ञाना अमृतावर उद्याचा वंचित ग्रामीण परिसर सजीवंत राहील.*
*शाळेला सर्व प्रकारचे सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती, तसेच गावकरी करतात.*
*म्हणूनच ही शाळा झेडपीची नव्हं… आपली बेलाड, पुर्णाकाठची*