पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ…..मंदीरातील दानपेटी, किराणा दुकान व बियर शॉपी टार्गेट..सव्वा लाखाचा ऐवज लंपास

कोळगाव मध्ये पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ…..मंदीरातील दानपेटी, किराणा दुकान व बियर शॉपी टार्गेट..सव्वा लाखाचा ऐवज लंपास
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी एकाच रात्री कोळाई देवीचे मंदिर, मंदिर पायथ्याशी असलेले किराणा दुकान व कोळगाव फाट्यावरील बियर शॉपचे शटर तोडून सुमारे रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. आहे.
या बाबत सविस्तर असे की, कोळगावचे आराध्य दैवत श्री कोळाईदेवी मंदिरात शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिराची दानपेटी चोरुन नेली. या दानपेटीत सुमारे ४ हजार रुपये होते, ही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रीत झाली आहे. चोरांनी पुढे मंदिराच्या पायथ्याशी बाळासाहेब कोल्हे यांच्या संतकृपा या किराणा दुकानाचे शटरचे कोंडे तोडून दुकानातील १५ ते २० हजार रुपयांचे किराणा सामान चोरुन नेला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नगर दौंड महामार्गावर जगताप यांच्या पेट्रोल पंपासमोर दीपक नलगे यांच्या मालकीच्या असलेल्या निखिल बियर शॉपी चे शटर उचकटून आतील विविध कंपन्यांचे ८० हजार ते एक लाख रुपये किमतीचे बियरचे सुमारे १५ ते २० बॉक्स चोरुन नेले.
एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या करून रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या बाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात मंदिराचे पुजारी राजेंद्र गुरव यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत डॉगस्कोड आणि ठसे तज्ञांना पाचारण करत पुढील तपास सुरू केला आहे.
कोळगाव परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनामुळे नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.आज पर्यंत देवीच्या मंदिरात व कोल्हे यांच्या दुकानात सहा महिन्यात ही दुसरी चोरीची घटना असून चोऱ्यांचे सत्र काही थांबेना त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे काल कोळगाव मध्ये रात्री ज्या वेळेला चोर मंदिरामध्ये चोरी करत होते त्याच वेळेला पोलिसांची रात्रीची गस्त चालू होती. पोलिसांनी 11.55 मिनिटांनी एटीएम च्या समोर फोटो काढले व चोरांनी त्याच सुमारास श्री कोळाईदेवी मंदिरातील 11.59 मिनिटांनी रोकड लांबवली हा योगायोग म्हणावा लागेल. म्हणजे चोर आणि पोलीस एकाच वेळेला कोळगाव मध्ये काल रात्री होते. सदर घटनेमुळे पोलिसांसमोर चोरांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.