टाकळीभान येथे स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळयास प्रारंभ

टाकळीभान येथे स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळयास प्रारंभ
मनुष्य जीवाला मुक्ती देणारी श्रीमद भागवत कथा जीवनात श्रवण करा-स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज
टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथेला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून आयोजित भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळयास शनिवारी दि.२० मे पासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.मनुष्य जीवाला मुक्ती देणारी
श्रीमद भागवत कथा जीवनात श्रवण करा असे आवाहन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
श्रीमद भागवत कथेच्या शुभारंभ प्रसंगी टाकळीभान गावातून सजविण्यात आलेल्या रथामधून स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांची फटाक्यांची आतषबाजी करत व तोफांची सलामी देत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीतील रस्त्यावर पुष्पवृष्टी करून भाविक ग्रामस्थांनी स्वागत केले.यावेळी भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आलेल्या कमानी सर्वांचे आकर्षण ठरले होते.
टाकळीभान येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य प्रांगणात श्रीमद भागवत कथा होत आहे मिरवणूकीचा समारोप प्रसंगी टाळमृदुंगाच्या गजरात स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांचे कथा स्थळी स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्या हस्ते भागवत ग्रंथ पूजन व दीपप्रज्वलन करून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राधे राधे गोविंद, गोविंद राधे राधे च्या गजराने भाविकांना मंत्रमुग्ध केले यामुळे वातावरण मंगलमय झाले होते.उपस्थित यजमानांच्या हस्ते आरती करून भागवत कथेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलतांना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की भगवंताचे नामस्मरण केले तर जीवनात भगवंताची प्राप्ती होते,ज्यांची भाव व भक्ती निर्मळ तीच भक्ती भगवंताला प्रिय असते, भागवत कथा मृत्यूला हा मंगल करते तर भागवत कथा श्रवणाने पितृदोष ही नाहीसा होतो,भागवत कथा श्रवण केली तर आपल्या अंतःकरणात भक्ती ज्ञान वैराग्य यामध्ये वाढ होते म्हणून श्रीमद भागवत ग्रंथ जीवाला मुक्ती प्रदान करणारा महा पुराण ग्रंथ असून यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा स्वभाव सामर्थ्य स्वरूप कसे आहे याचे वर्णन केले असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी झालेल्या भागवत कथा प्रसंगी हनुमान गड संस्थानचे महंत हभप संतोष महाराज चौधरी,भानुदास महाराज नवले, महंत ओंकार महाराज जंगम,रविंद्र महाराज गांगुर्डे, दत्तात्रय महाराज बहिरट,मृदुंगाचार्य दादा महाराज साबळे,संदीप महाराज,गायनाचार्य सचिन महाराज पवार,सनईवादक तोडकर,
बासरी वादक किर्तीश महाराज,जालिंदर महाराज साळुंके, देवगडचे सेवेकरी तात्या महाराज शिंदे,शुभम महाराज बनकर यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.झालेल्या कथेप्रसंगी भेंडे येथील गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले