संत भगवान बाबा एक दिव्यत्वाची प्रचिती देणारे अद्भुत,

*अद्भूत , अलौकिक वैराग्यवान संत भगवानबाबा*
संत भगवान बाबा एक दिव्यत्वाची प्रचिती देणारे अद्भुत,
अलौकिक व वैराग्यवान संत म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जातात .त्यांचे भक्तगण विविध जातीपातीत , विविध देशात , वेगवेगळ्या प्रांतात , आणि भारतातील विविध राज्यातील गावागावात
आढळतात यामागचे प्रमुख कारण म्हणजे भगवान बाबाचे अनोखे कसे समाजकार्य होय .भगवान बाबांनी पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा ,विदर्भ , तेलंगणा .
आंध्र प्रदेश , कर्नाटक या भागातील गावोगावी फिरून समाजप्रबोधन केले . त्यांनी कीर्तनातून समाजाचे उदबोधन करून समाजाला एकजूट केले .भागवत संप्रदायाचा विस्तार त्यांनी मोठे हिमतीने केला .
सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये मिसळून त्यांनी शैक्षणिक , सामाजिक , नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले .
त्यासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम निवडले . आपल्या कीर्तनातून ते ज्ञानमार्ग , भक्तीमार्ग ,कर्ममार्ग , आणि राजमार्ग यांचे ज्ञान देत असत त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला
सर्वसामान्य व्यक्तीपासून ते मोठमोठ्या राजकीय हस्तीपर्यंत अनेक लोक गर्दी करत असत . त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जातीभेद , अज्ञान , अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी ,परंपरा यांच्यावर तीव्र शब्दात प्रहार केले मानवता ,
समता ,समानता , समरसता ,बंधुत्व आणि तात्विक विचार यांचा भगवान बाबांनी पुरस्कार केला . त्यांनी वारकरी संप्रदायात आधुनिक विचारांचा प्रचार आणि प्रसार केला .
त्यांनी स्वतः उत्तम शरीरसौष्टव कमावले व गावागावातील लोकांनाही व्यायामाचे महत्त्व पटवून दिले . वेळेप्रसंगी लोकांना व्यायाम , योगविद्या यांचे उत्तम ज्ञान त्यांनी दिले .भगवान बाबांचे योगविद्येवर खूप प्रभुत्व होते . त्याकाळचे अनेक लोक सांगतात की
भगवान बाबा पाण्यावर पंचा टाकून त्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायचे असे उदाहरण इतिहासात केवळ एकमेव आहे . त्यांच्या या भागवत संप्रदायातील अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना “भागवत संप्रदायाला आधुनिक रूप देणारे महान संत ” म्हणून ओळखले जाते . बाबांनी समाजाला मोठ्या प्रमाणात एकजूट करण्यासाठी नारायणगडावर सप्ताह करायला सुरुवात केली .
त्यांनी १९१८ते १९३४ या काळात नारायणगड परिसरात १७ सप्ताह करून समाजाला अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न केला . या सप्ताहात लोकांच्या आपापसातील प्रेमात वाढ होत असे . स्नेहभाव वाढवून समाज एकजूट आणि एकसंध होत असे .
जगात होणाऱ्या अत्याधुनिक घडामोडींची बाबा त्यांना माहिती देत असत . तसेच भविष्यातील आव्हानानबद्दल , भविष्यातल्या संधीबद्दल बाबा लोकांना मार्गदर्शन करत असत
आधुनिकतेच्या वादळात आपला हिंदू धर्म आपला संप्रदाय हा दूषित होऊ नये म्हणून त्यांनी प्राचीन भारतीय ऋषीमुनींच्या,
श्रीरामच्या श्रीकृष्णांच्या दैवी विचारांचे तेज आपल्या शब्दातून लोकांपर्यंत पोहोचवले . जुन्यातील उत्तम विचार व नाविन्यातील ही चांगले विचार स्वतः स्वीकारून ते समाजाला स्वीकारण्यास बाबा आग्रह करत असत . समाजाने संस्कार ,
नीतीमूल्ये , उत्तम राखून अत्याधुनिक शिक्षण घ्यावे यासाठी बाबांनी सदैव अगत्याने आग्रह धरला . यासाठी त्यांनी काही शैक्षणिक संस्था उभारल्या .
अशा संस्थांसाठी भक्तांकडून ऐच्छिक रुपाने मदत जमा केली . अनेक अनेक गरीब , अनाथ विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षणाची सोय केली. पुढे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनात उत्तम अधिकारी म्हणून कार्य केले .
भगवानबाबा हे भगवान विष्णूपासून सुरू झालेल्या अत्रि ऋषी ,संत एकनाथ महाराज ,संत नगद नारायण महाराज ,संत माणिक बाबा यांच्या गुरु शिष्य परंपरेतील ते एक महान संत शिष्य होते . त्यांना सर्वप्रथम गीतेबाबांनी तुळशीमाळ घालून आपला शिष्य बनवले .त्यानंतर माणिकबाबांनी भगवानबाबांना आध्यात्मिक उपदेश केला .त्यानंतर अधिकचे आध्यात्मिक ज्ञान , कीर्तन ,प्रवचन
करण्याची कला त्यांना बंकटस्वामी महाराजांनी शिकवली . पैठणच्या एकनाथ महाराजांना भगवानबाबांनी फडाचे गुरु मानले होते . पारमार्थिक ज्ञानात ते संत नामदेवांना गुरु मानत असत . संत वामनभाऊ यांना सुद्धा ते गुरुस्थानी मानत असत . त्यामुळे सहा – सहा महान संतांचे ते शिष्य होते या सर्वांकडून त्यांनी सर्वोत्तम ज्ञान स्वीकारले होते व ते त्यांनी परमपवित्र , साध्या आणि सरळ पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले . उभे आयुष्य संन्याशी राहून त्यांनी समाजातील लोकांचे जीवन सुलभ आणि आनंददायी होण्यासाठी खडतर कष्ट सहन केले .
संत भगवान बाबांनी इसवी सन १९२७ या वर्षी नारायणगड ते पैठण ही पायी दिंडी सुरू केली . यातून बाबांनी सामाजिक कल्याणाचे अनेक उद्देश साध्य केले होते दिंडीमुळे समाजाला खालील प्रमाणे फायदे झाले
. १) दिंडीमुळे लोकांना नवीन प्रदेशाची , तेथील लोकांची , लोकांच्या रूढी , परंपरांची , त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीची, त्यांच्या आर्थिक स्थितीची, त्यांच्या उद्योग – व्यवसायाची उत्तम माहिती मिळत होती . त्यातून उत्तमोत्तम ते स्वीकारून लोकांनी आपले जीवन अधिक समृद्ध केले .
२)त्याकाळी दवाखाने , वैद्य कमी होते मग आजारी लोक आपला आजार आयुष्यभर अंगावर काढत . त्यांना उत्तम आरोग्य मिळण्यासाठी व्यायामाची गरज आहे . योगासनाची , प्राणायामाची गरज आहे हे बाबांनी त्या काळी ओळखून लोकांसाठी पायी दिंडी काढून त्याद्वारे प्राणायाम व व्यायाम नकळत होऊन त्यामधून लोकांना त्यांनी व्याधीमुक्त केले .
३ ) त्या काळाचे सर्वोत्तम वक्ते म्हणजे त्यावेळेस संत होते .अशा महाराष्ट्रीयन संतांचे विचार पैठण, पंढरपूरमध्ये ऐकता येतील व आपला महाराष्ट्रीयन समाज अधिक समृद्ध होईल याची बाबाला कल्पना असल्यामुळेच त्यांनी वारी सुरू केली होती . ४) पायी वारीतून
वारकरी एकमेकांच्या सहवासात येऊन त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार होतील त्यामुळे जातीपातीच्या बेड्या गळून पडतील . आपला महाराष्ट्रीयन समाज एकजूट होऊन इंग्रजाविरुद्ध आणि निजाम विरुद्ध सफल लढा देऊ शकेल हाही विचार पायी दिंडी काढण्यामागे त्यांचा होता . याशिवाय अनेक उदात्त विचारातून त्यांनी दिंडी (पायी वारी ) सुरु केली होती .
५ )भगवानबाबांना कितीही त्रास झाला तरी त्यांनी कधी उग्र विचार व्यक्त करून महाराष्ट्रीयन समाजात फूट पडेल असे कोणतेही कृत्य केले नाही . उलट संयमाची प्रेमाची भूमिका घेत त्यांनी प्रत्येक वेळी सर्वमान्य मार्ग काढला की त्यांची सहनशीलता ही त्यांना पायी दिंडीतून मिळाली व ती त्यांनी त्या काळच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली . हे कार्य त्यांनी पायी दिंडी साध्य केले .
माणिक बाबाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांच्यावर गडाच्या लोभाचा आरोप करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या महाराष्ट्रीय समाजाच्या एकतेला तडा जाऊ नये म्हणून मोठ्या स्वाभिमानाने आणि दिलदार वृत्तीने स्वतःतील वैराग्य दाखवून श्रद्धापूर्वक नारायणगड सोडला . त्यानंतर पुढे त्यांनी धौम्यगड विकसित करून पुन्हा समाजाला नवीन ज्ञान आणि दिशा देण्याची सुरुवात केली . धौम्यगडाचा जिर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी स्वतः बांधकामाचे आराखडे तयार केले हे आराखडे आजही एखाद्या कुशल अभियंत्यालाही आश्चर्याचा धक्का देतात . कारण येथे झालेल्या बांधकामात कुठेही लाकूड ,पत्रे , लोखंड वापरलेले नाही तर छतासह सर्व बांधकाम फक्त काळया पाषाणात केलेले आहे . हे आजही आपल्याला सर्वांना बघून खात्री करता येते . या गडाच्या बांधकामासाठी नवगण राजुरी येथील राजुरीच्या डोंगरातून दगड नेण्यात आले .यासाठी सर्व महाराष्ट्रीयन समाजाने श्रमदान, धनदान, गुप्तदान केले .पुढे धौम्यगडाचे रूप बदलू लागले .बाबाच्या कर्तृत्वाची चर्चा सर्वत्र झाली . बाबांची किर्ती सर्वदूर पोहोचली त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यावेळेसचे महान संत मामासाहेब दांडेकर , महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे त्यावेळेचे सभापती बाळासाहेब भारदे यांनी धौम्यगडावर येऊन बाबाची भेट घेऊन ; आशीर्वाद घेतले . त्यावेळी बाबांचे धौम्यगडावरील काम पाहून प्रभावीत झालेल्या तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे दस्तूरखुद्द यशवंतराव चव्हाण यांनी धौम्यगडाचे नामांतरण भगवानगड केले .
भगवान बाबांनी भगवान गडावर विद्यालय सुरू केले. यावरून शिक्षणाबद्दलचा बाबांचा आधुनिक दृष्टिकोन किती प्रगल्भ होता हे स्पष्ट होते . बाबांनी भगवान गडावरून पंढरपूर आणि पैठण येथे पायी दिंडी सुरू केली . नारायणगडावर सुरु केलेले कार्य त्यांनी पुढे उभे आयुष्यभर भगवानगडावरून केले .
भगवान बाबांचे योग विद्येवर खूप प्रभुत्व होते ; त्यामुळे अनेक लोक सांगतात की भगवान बाबा पाण्यावर पंचा ( उपरणे) टाकून त्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायचे असे उदाहरण इतिहासात केवळ एकमेव आहे . काही लोकांना भगवान बाबाचे कार्य कदाचित विशेष वाटणार नाही ; पण तो काळ निजामाच्या राजवटीचा होता . उघड – उघड सण , उत्सव , धार्मिक कार्यक्रम करणे अवघड झालेले होते . त्या काळात भक्ती मार्गाचा प्रसार व प्रचार करणारे भगवान बाबा किती मोठ्या धाडशी व्यक्ती होते याचा प्रत्यंतर आल्यावर त्यांचे महान कार्य लक्ष येते . समाजात कर्मकांड , कर्मठपणा , अनिष्ट रूढी , यामुळे धर्म मधील झाला होता लोक अज्ञान , अहंकार , अंधश्रद्धा , मांसाहार धर्मांतरण अशा वेगवेगळ्या संकटांनी पिडलेले होते . समाज दिनवाना ,हीनवाना होऊन अपमानित आयुष्य जगत होता . अशा समाजाला बाबांनी आत्मबल दिले . असे आत्मबल देऊन समाज अधिक समृद्ध केला . याचा विचार केल्यावर भगवान बाबा किती ज्ञानी व धर्म सुधारक वृत्तीचे होते याचे दर्शन घडते . त्यांच्या दिंडीतील वारकरी असणाऱ्या दगडाबाई यांनी बाबांच्या मार्गदर्शनाखाली , बाबांच्या आशीर्वादाने अनेक भक्तिगीते लिहिले . या भक्ती गीतावर प्रभावित होऊन भारताच्या त्या वेळीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दगडाबाईची भेट घेतली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दगडाबाईंना गायनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला दगडाबाईंची भक्तीगीते व त्यातील भावना कळल्यावर त्यांचे थोरपण आणि त्यांच्या गुरूंचे म्हणजे भगवान बाबाचे श्रेष्ठत्व लक्षात येते .भगवानबाबांची कीर्तन ऐकणारे लोक त्यांच्या गायनाला केवळ ‘अद्भुत ‘ एवढे शब्द वापरत . त्यामुळे त्यांच्यातील उत्तम गायकाची ओळख ही होते . गावागावातील कुप्रथा बंद करून , मांसाहार बंद करून समाजाला बाबांनी समृद्ध केले हे बघितल्यावर बाबा मधला क्रांतिकारक आपल्याला दिसतो . भगवान बाबांचे कार्य खूप मोठे झाले . अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला .पण बाबांनी आपला शांत स्वभाव ढळू दिला नाही . मुळात शांत स्वभाव हेच संतांचे सर्वात मोठे लक्षण असते याचा प्रत्यंतर भगवानबाबांच्या संपूर्ण आयुष्यात लोकांना पदोपदी येत होता . बाबांना त्रास देणाऱ्या लोकांची कटकारस्थाने उघडी पडली पण बाबांनी त्यांनाही विशाल हृदयाने माफ केले . त्यामुळे भगवान बाबांचे कार्य आणि कर्तृत्व हिमालयाच्या उंचीचे झाले . बाबांना होणारा विरोध पुढे कमी होत गेला .परंतु भगवान बाबाला त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी ,अनेक संकट झेलावी लागली पण ज्ञानेश्वरीत वर्णन केलेल्या स्थितप्रज्ञ मनुष्याप्रमाणे बाबा आयुष्य जगले . शेवटी बाबांची प्रकृती खालावत गेली व १८ जानेवारी १९६५ रोजी पुणे येथील रुबी हॉल या इस्पितळात ज्ञानेश्वरी ऐकत ऐकत बाबांनी प्राण सोडला . संपूर्ण महाराष्ट्र समाज टाहो फोडून रडला . बाबांना समाधी दिली गेली . जगाचे प्रबोधन करणारा महान आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला . परंतु आजही भगवानगडावर असणारी त्यांच्या हातातील भगवी पताका तेथे येणाऱ्या भाविकांच्या मस्तकावर बाबांच्या आशीर्वादाचा वर्षाव करत मोठ्या थाटात उभी आहे . असे ते धन्य धन्य भगवानबाबा आणि धन्य धन्य त्यांचं कार्य .
__________________
संत भगवान बाबांचे कार्य थोर ।
आपल्या धर्माचा केला त्यांनी जागर ।
असा महात्मा पुन्हा नाही होणार ॥