खेडले परमानंद ऐतिहासिक मठाची खोदाई प्रकरणी जिल्हाअधिकारी यांच्या कडून दखल महसुल व पोलीसांनी केला पंचनामा.

खेडले परमानंद ऐतिहासिक मठाची खोदाई प्रकरणी जिल्हाअधिकारी यांच्या कडून दखल महसुल व पोलीसांनी केला पंचनामा.
खेडले परमानंद तालुका नेवासा येथील पुरातन ऐतिहासिक वास्तू शिवभारत कार कवींद्र परमानंद यांच्या ऐतिहासिक मठात रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीकडून होत असलेल्या खोद कामाचा धक्कादायक प्रकार नुकताच ग्रामस्थांच्या निदर्शनास आला त्यामुळे एकच खळबळ उडाली होती .
सदरचे खोदकाम धनासाठी होत -होते की आणखी कुठल्या कारणासाठी याबाबत गावामध्ये एकच चर्चा आहे.
घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की शिव भारत कार कवींद्र परमानंद यांच्या मठात ध्यान मंदिरात व सभा मंडपाच्या गुप्त खोलीत हे उत्खनन काही दिवसांपूर्वी झालेले असून त्यामध्ये जाळे दिसून आले.
झालेले उत्खनन हे गुप्त ठिकाणी आडमार्गी असल्यामुळे हे ग्रामस्थांच्या लक्षात आले नव्हते, याबाबतची माहिती कळताच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधला.
क्षणाचा ही विलंब न करता जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी तात्काळ महसूल विभागाला चौकशीचे आदेश दिले, आज दिनांक 29 मे 2023 रोजी नायब तहसीलदार किशोर सानप, सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी ,तलाठी भाऊसाहेब नवाळे यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला,व लवकरच संबंधित घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना सादर करणार असल्याची माहिती दिली.
संबंधित घटनेमुळे शिवकालीन ऐतिहासिक वास्तूची विटंबना झालेली आहे त्यामुळे सदर घटनेचा सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.आरोपी हे गावातीलच असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना केल्याप्रकरणी सीआयडी मार्फत संबंधित घटनेचा तपास करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.