मागोवा-2021 कार्यक्रम उत्साहात संपन्न नैसर्गिक शेती शेतकर्यांसाठी फायद्याची ठरेल – विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे

मागोवा-2021 कार्यक्रम उत्साहात संपन्न
नैसर्गिक शेती शेतकर्यांसाठी फायद्याची ठरेल
– विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे
अशोक मंडलिक
दि. 6 जानेवारी, 2022
शेतीचा खर्च कमी कसा करता येईल यावर संशोधन झाले पाहिजे. शहरातील लोकांची आरोग्याविषयीच्या जागृकतेचा फायदा सेंद्रिय शेती करणार्या शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या करीता बाजारपेठेचा विचार केला तर सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेती शेतकर्यांना फायद्याची होईल असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात मागोवा-2021 या हायब्रीड मोडमध्ये आयोजीत कार्यक्रमात उदघाटनपर भाषणात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते. या कार्यक्रमासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र क्षीरसागर, पद्मश्री श्री. पोपटराव पवार, बीजमाता पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे, अन्नमाता सौ. ममताबाई भांगरे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक श्री. सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता इंजि. मिलिंद ढोके उपस्थित होते.
श्री. गमे पुढे म्हणाले की कृषि संशोधनाच्या बाबत विकेल ते पिकेल याचा उपयोग करुन लोकांना संशोधनात काय पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणावर ब्रिडर बियाणे तयार केल्यास त्याचा फायदा बियाणे संशोधन करणार्या संस्थांना होईल. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्य अतिशय मोलाचे आहे. विद्यापीठातून पदवी घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रात उद्योजक बनून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. हे खर्या अर्थाने खरे आयडॉल आहेत. मिळालेल्या ज्ञानाचे रुपांतर हे प्रात्यक्षिकात उतरविणे महत्वाचे आहे तरच आपण शहाणे होतो व जगाला शहाणे करतो. उत्कृष्ट पध्दतीने शेती करणार्या शेतकर्यांचा व कृषि उद्योजकांचा आपण प्रत्येक महिन्यात पोस्टरद्वारे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्रसिध्दी देवून त्यांचा योग्य प्रकारे सन्मान करण्याची प्रथा विद्यापीठात सुरु केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आपल्या भाषणात म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे योगदान ग्रामिण भागाबरोबरच बियाणे इंडस्ट्री, अन्न तंत्रज्ञान, मशीनरी इंडस्ट्री, प्रशासन तसेच परदेशातील फलोत्पादन व लॅडस्केप गार्डनींग या सारख्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शेतीतील प्रयोगशील शेतकर्यांच्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव विद्यापीठाच्या संशोधनात व्हायला हवा तरच शेतीतील मजुरांचा प्रश्न सुटण्यास मदत हाईल. यावेळी श्री. पोपटराव पवार व सौ. राहिबाई पोपेरे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वतीने श्री. पोपटराव पवार व सौ राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. ममताताई भांगरे यांना सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या निमित्ताने विद्यापीठाचे लोकप्रिय प्रकाशन कृषिदर्शनी 2022 व कृषि दिनदर्शिका-2022 चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले. संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांनी सन 2021 चा संशोधनाचा व विस्तार शिक्षणाचा आढावा सादर केला. अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ यांनी शिक्षणाचा आढावा, कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी प्रशासनाचा आढावा, वित्त विभागाचा आढावा श्री. सुखदेव बलमे व विकास कामांचा आढावा श्री. मिलिंद ढोके यांनी सादर केला.
याप्रसंगी सर्व सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले. हा कार्यक्रम कोव्हीड-19 चे नियम पाळून फक्त 50 अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहाही जिल्हयातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.
राहुरी प्रतिनिधी