रजिस्ट्री कार्यालय परिसरात जमीनीच्या वादातून गोळीबार एक जण जखमी. !

गोळीबाराने बीड हादरले ! रजिस्ट्री कार्यालय परिसरात जमीनीच्या वादातून गोळीबारात एक जण जखमी !
जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून बीडच्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून गोळीबार करून पसार झालेल्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
यासंदर्भात बीड जिल्हा पोलिस अधिक्षक राजारामा स्वामी यांनी या घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती देताना सांगितले की, जमीनीच्या खरेदी-विक्रीवरून वाद झाला. या वादावरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पुढील माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
सीसीटिव्ही फुटेज संदर्भातही माहिती घेतली जात आहे. फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. परिसरात सीसीटीव्ही आहे. मात्र, हार्डडिस्क आहे की नाही याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत काही उपयुक्त माहिती मिळालेली नाही, असेही ते म्हणाले.
या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सिद्दीकी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. किती फायर झाले, याची माहिती घेतली जात आहे. दोषींना अटक/ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक राजारामा स्वामी यांनी दिली.
या घटनेत जखमी झालेल्या सिद्दीकी यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचारानंतर त्यांचा जवाब घेण्यात येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हा पोलिस अधिक्षक राजारामा स्वामी यांनी दिली.
दरम्यान, जमीन खरेदी-विक्रीवरून झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असली तरी प्रत्यक्षात दोघे जखमी झाल्याचे समजते. एका जणाच्या पायाला गोळी लागली.