आघाडी सरकारचा वाईन विक्री करून तरुण पिढ्या बरबाद करण्याचा कट
महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतलेला वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा; क्रांतीसेनेची मागणी

आघाडी सरकारचा वाईन विक्री करून तरुण पिढ्या बरबाद.
महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतलेला वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा; क्रांतीसेनेची मागणी
महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपरमार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे सहज वाईन उपलब्ध झाल्याने तरूण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन सत्यानाश होणार असल्याने वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे कौटुंबिक कलह निर्माण होऊन महिलांच्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यातुन अनेक गरीब कुटुंबे कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त होणार आहे. तसेच व्यसनी लोकांकडून गुन्हेगारीच्या प्रवृत्तीत वाढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे, महिला विकासाची धोरणे शासन जाहीर करते. दुसरीकडे वाईन विक्रीचे परवाने खुले करून त्यांचे जीवन असुरक्षित करण्याचा शासनाचा दुटप्पीपणा यातुन दिसून येत आहे. जागोजागी वाईन विक्रीला असतील तर त्याचा खप वाढणार आहे. त्यातून नसलेल्या उद्दिष्टांवर कुटुंबाचा खर्च वाढेल. परिणामी महिला आणि मुलींची सुरक्षा आणि आरोग्य धोक्यात सापडणार आहे. त्याचबरोबर हा निर्णय भावी पिढीचे नुकसान करणारा आहे. किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळू लागल्यास शालेय मुले, युवक, महाविद्यालयातील मुले, मुली वाईनच्या आहारी जातील. त्यामुळे तरुण पिढीचे मानसिक, आर्थिक, शारीरिक, सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन पिढी बरबाद होणार आहे.
सरकारला शेतकरी हिताचे निर्णय घ्यायचेच असेल तर त्यांनी क्रांतीसेनेकडुन मागील दोन तीन वर्षांपासून मागणी केल्या जात असलेल्या शेतकरी प्रश्नांची सोडवणूक करावी. त्यातुन शेतकर्यांची आर्थिक उन्नती होऊन शेतकरी रेघारुपाला येईल. त्याच बरोबर तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग राबवुन तरुण शेतकर्यांना सहकार्य करावे, वाईन कंपन्यांना नव्हे. त्यामुळे शासनाने हा निर्णय रद्द करून पिढ्या बरबाद करण्याचे काम थांबवावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन राहुरीचे तहसीलदार शेख यांना देताना क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, सुरेशराव म्हसे, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, प्रभाकर म्हसे, डॉ पांडुरंग म्हसे, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, नवनाथ ढगे, गोरक्षनाथ देशमुख, यशवंत म्हसे, संजय पवार, भाऊसाहेब पवार, शेखर पवार, संदीप उंडे, कुमार डावखर, आप्पासाहेब माळवदे, सुनिल काचोळे, शाम कदम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.