*अण्णा भाऊ साठे हे “विश्वरत्न” आहेत – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी*

*अण्णा भाऊ साठे हे “विश्वरत्न” आहेत – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी*
“अण्णा भाऊ साठे यांनी जे साहित्य लिहिले ते दलित, मागासवर्गीय यांचा सन्मान करणारे होते. त्यांनी समाज परिवर्तनासाठी आपले लेखन केले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या सारखे महापुरुष हे एका जातीचे किंवा एका समाजाचे नसतात. तसेच, अण्णा भाऊ हे केवळ “भारतरत्न” नाहीत तर ते “विश्वरत्न” आहेत” अशा पद्धतीचे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोशारी यांनी मांडले. दलित महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहामध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे होते.
भगतसिंग कोश्यारी पुढे म्हणाले की, “अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावे ही मातंग समाजातील लोकांची इच्छा आहे. आपल्या या समाज भावनेचा आदर करून मी या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मी स्वतः दिल्लीपर्यंत प्रयत्न करेन” असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. अध्यक्षपदावरून बोलताना विधानसभेचे अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर म्हणाले की, “दीड दिवस शाळेत गेलेले अण्णा भाऊ साठे यांनी जे साहित्य निर्माण केले आहे ते महान स्वरूपाचे आहे. त्यांच्या या महान कार्याबद्दल मुंबईमध्ये एक अकॅडमी स्थापन होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया.”
दलित महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती समारंभामध्ये दलित महासंघाच्या महिला आघाडी च्याअध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी “अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे अशा प्रकारची मागणी केली आणि त्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत” असे आवाहन केले.
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले की, ” अण्णा भाऊ साठे हे ग्रामीण भागातून आलेले लेखक होते. त्यांचे जीवन हे संघर्षमय होते. लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष त्यांनी पाहिला होता. म्हणूनच आपल्या साहित्यामध्ये त्यांनी संघर्षाला आणि जगण्याला महत्त्व देऊन लेखन केले आहे”
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ” मातंग समाज हा स्वातंत्र्यानंतर ही उपेक्षित आहे. सर्व समाज घटकांनी परस्परांमध्ये संवाद ठेवला पाहिजे. आपल्या सर्वांचे प्रश्न हे समान आहेत हे लक्षात घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात लढले पाहिजे तरच आपल्याला स्वाभिमान व सन्मान मिळू शकेल” असे विचार गोपीचंद पडळकर यांनी मांडले.
दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे आपल्या भाषणात म्हणाले की, ” मातंग समाजाचा आरक्षणातील वाटा हा गेल्या 75 वर्षांमध्ये मातंग समाजाला मिळालेला नाही. अनुसूचित जातीमधील प्रभावी जाती या जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षण हा या समाजाच्या प्रगतीसाठी कळीचा मुद्दा असून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी विधानसभा आणि संसदेमध्ये आवाज उठवून मातंग समाजाला न्याय द्यावा.”
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर दीप प्रज्वलन करून जयंती समारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रास्ताविक दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील यांनी केले. तर आभार राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे यांनी मांडले. प्राचार्य दीपक तडाके यांनी अत्यंत सुंदर शैलीमध्ये सूत्रसंचालन केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती साठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातंग समाजाच्या इतिहासात अण्णा भाऊंच्या जयंती कार्यक्रमांमध्ये प्रथमच राज्यपाल यांची उपस्थिती असल्यामुळे समाज बांधवांमध्ये कमालीचा उत्साह होता हे स्पष्ट दिसत होते.