मिरी तिसगांव पाणीयोजनेसाठी रु.१५५ कोटी ला कार्यारंभ आदेश

मिरी तिसगांव पाणीयोजनेसाठी रु.१५५ कोटी ला कार्यारंभ आदेश
राहुरी मतदार संघातील अनेक दिवसांपासुन प्रतिक्षेत असलेली जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत मिरी तिसगांव पाणीपुरवठा योजना साठी १५५ कोटी खर्चाच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाले असल्याची माहिती मा.मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे रु.१५५ कोटी खर्च येणार आहे. या योजनेला 16 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण समितीने तांत्रिक मान्यता दिली होती. मिरी तिसगांव व इतर 33 गावांकरीता वरदान ठरणा-या या पाणी योजनेस आता कार्यारंभ आदेश झालेला आहे. याकामामुळे मतदार संघातील पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगांव व इतर 33 गावातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असुन या गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या पाणी योजनेत नव्याने काही जलकुंभ उभारण्यात येणार आहे त्यामध्ये चिचोंडी ,करंजी, लोहसर, मांडवे, मोहोज बु, मोहोज खु, रेणुकाईवाडी, रुपेवाडी ,शिराळ, तिसगांव, त्रिभुवनवाडी, धारवाडी, कडगांव, कौडगांव, निंबोडी, देवराई, घाटशिरस, डमाळवाडी, खांडगांव, जोहारवाडी ,सातवड शिरापुर, करडवाडी व नगर तालुक्यातील पांगरमल,मजले चिंचोली तसेच राहुरी तालुक्यातील कात्रड व गुंजाळे आदी गांवात नव्याने जलकुंभ उभारणी होणार आहे.
मिरी तिसगांव पाणी पुरवठा योजनेसाठी मा.मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात वेळोवेळी पाठपुरावा करुन तसेच मंत्रालयात बैठका घेवुन हा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या अनेक दिवसापासुनची प्रतिक्षा आता संपली असुन मतदार संघातील या गावांना आता स्वच्छ पाणी पुरवठा होणार असल्याने लाभधारक गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाभधारक गावांमधील जनतेने आमदार तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.