मुंबई उच्च न्यायालयाचे न्या राजेंद्र अवचट यांच्या गेवराईतील न्यायालयाच्या इमारतीचे 7 एप्रिलला उद्घाटन

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या राजेंद्र अवचट यांच्या
गेवराईतील न्यायालयाच्या इमारतीचे 7 एप्रिलला उद्घाटन
गेवराई शहराच्या वैभववात भर टाकणाऱ्या आणि न्यायप्रक्रियेला गती मिळण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गेवराई येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन भव्य इमारतीचा उद्घाटन समारंभ दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर बीडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग गेवराई संजय घुगे आणि वकील संघाचे अध्यक्ष ऍड अमित मुळे यांनी केले आहे.
गेवराई शहरात न्यायालयाची भव्य आणि सुसज्ज इमारत उभा राहावी यासाठी तत्कालीन आमदार असलेले माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शासन दरबारी मोठे प्रयत्न केले आणि कामासाठी निधी मिळवून घेतला. इमारतीचे कामही गतीने झाले परंतु सत्तांतर झाल्यानंतर सदर इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील काम आणि आतील फर्निचरच्या कामाला मोठी दिरंगाई झाली. यामुळे सदर काम सहा वर्ष रखडले. उर्वरित काम लवकर पूर्ण व्हावे या मागणीसाठी गेवराईतील वकील बांधवांनी बारा दिवस न्यायालयीन परिसरात धरणे आंदोलन केले. याची दखल घेऊन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोर्ट इमारतीच्या कामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटी 52 लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळून घेतली आणि सदर काम पूर्णत्वास गेले. याच इमारतीचा उद्घाटन सोहळा आता 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता सर्वांच्या साक्षीने होणार आहे. यामुळे गेवराईकरांना या सोहळ्याची आतुरता लागून राहिली आहे. सदर इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर या भव्य इमारतीत कोर्टाची संख्या वाढून निश्चितपणे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली लागण्यासाठी गती येईल अशी अपेक्षा स्थानिक वकील बांधवांनी व्यक्त केली आहे.