मध्यरात्री चोरट्यांनी साई सेवा पतसंस्था,पाच दुकानासह एका घरफोडीत लाखोंचा ऐवज लांबविल्याची घटना घडली
श्रीगोंदा जनप्रवास प्रतिनिधी: तालुक्यातील मढेवडगांव येथे बुधवारी (१३) मध्यरात्री चोरट्यांनी साई सेवा पतसंस्था,पाच दुकानासह एका घरफोडीत लाखोंचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. शटरच्या कुलुपाचा कडी कोयंडा तोडून दुकानात प्रवेश करुन या चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीगोंदा येथील मेडिकल व पतसंस्था फोडीचा अजूनही तपास लागलेला नाही. तोच श्रीगोंदा पोलिसांपुढे हे नवे आव्हान उभे राहिले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मढेवडगांव गावातील मेन रोडवरील साई सेवा पतसंस्था, एस.पी.एम केक शॉप,सुनिता किराणा,तुलसी स्वीट होम, श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक, यश मेडिकल व सध्या पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रेरणा सुजय शिंदे यांचेही बंद घर फोडून घरफोडी केली असून अंदाजे अर्धा किलो चांदीचे दागिने चोरीस गेले आहे. तसेच दुकानाच्या शटरचा कडी कोयंडा कटरच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी दुकानातील सामानाची उचकापाचक केली आहे.
साई सेवा पतसंस्थेतून एक लाख २५ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली.तुलसी स्वीट होम या दुकानच्या गल्ल्यातून २५ हजार रुपये असा एकूण अंदाजे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.एकाच रात्री सात ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभंग,पोलीस उपनिरीक्षक माळी व त्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.घटनेचा पंचनामा केला आहे. या वेळी ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. एकाच रात्री सात ठिकाणी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.